”सरकार म्हणून जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करू, नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत केली जाईल. मदत पुरवठा होताना कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ देणार नाही.जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत. एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जाहीर केलं आहे.” चिपळूण येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली व यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ”मी एवढच सांगतो आहे की, सुरूवातीला आम्ही तातडीची  मदत करतच आहोत, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना तशा सूचना देखील दिल्या गेल्या आहेत.  एकदा संपूर्ण आढावा आला की, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर या ठिकाणचा सगळा एकत्रित आढावा घेऊन आर्थिक मदत देखील दिली जाईल. काही ठिकाणी रस्ते, पूल देखील वाहून गेले आहेत, मोठं नुकसान झालं आहे. पिकाचं नुकसान झालेलं आहे आणखी काही नुकसान झालं असेल, या सर्वांचा एकत्रित आढावा घेऊन, आपण जे करता येणं शक्य आहे व जे करणं आवश्यक आहे ते सर्व करू.”

केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही –

”दोन-चार दिवसांमध्ये राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येईल, मात्र आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते व इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तत्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिले आहेत. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन त्यानंतरच नुकसानभरपाई संदर्भामध्ये जाहीर करण्यात येईल, तसेच केंद्राकडूनदेखील काय आणि किती मदत मागायची ते ठरवता येईल.” असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारपरिषदेत बोलून दाखवलं.

तसेच, ”मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नयेत या संदर्भातील सूचनादेखील मी प्रशासनाला केल्या आहेत.यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत. वारंवार संकटे येत आहेत हे लक्षात घेऊन या सर्व संबंधित जिल्ह्यांमध्ये एनडीआरएफच्या धर्तीवर स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात येईल. राज्य आपत्ती निवारण दले म्हणजेच एसडीआरएफ आहेच, पण ते अधिक सक्षम करू.” असं देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

 

पंतप्रधान मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह यांच्याकडून फोन करून चौकशी – मुख्यमंत्री

”केंद्र सरकारकडून मदतीसंदर्भात सांगायचं झालं, तर दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी मला फोन केलेला आहे. गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी देखील फोन केला. त्यांच्याकडून एनडीआरएफ, आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या सर्वांची मदत दिली जात आहे. जे काही आवश्यक असेल ते आम्ही तुम्हाला देऊ, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. यापुढे ज्या काही आपल्याला दुरगामी योजना करायच्या आहेत, त्यासाठी त्यांचं सहाय्य आपल्याला लागणारच आहे. सध्या केंद्राकडून देखील आपल्याला मदत होत आहे.” अशी देखील माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारपरिषदेत बोलताना दिली.

“काहीही करा, पण आम्हाला उभं करा,” उद्धव ठाकरेंसमोर पूरग्रस्त महिलेला अश्रू अनावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूणमध्ये दाखल झाले. चिपळूण व खेडमध्ये पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चिपळूणमधील बाजारपेठेतील रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. तेव्हा तेथील एका महिलेने मुख्यमंत्र्यांसमोर टाहो फोडत काही करा पण आम्हाला उभं करा, अशी मागणी केली. मुख्यमंत्र्यांनी देखील या महिलेचं म्हणणं ऐकून घेत, तिला धीर देण्याचा प्रयत्न केला.