प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणारे देखील तालिबानी विचारसरणीचे असल्याचं म्हणत त्याला समर्थन देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे असे म्हटले आहे. आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सारख्या संघटनांचेही लक्ष्य तालिबानसारखे आहे आणि भारतीय संविधान त्यांच्या ध्येयाच्या मार्गात येत आहे, पण जर संधी मिळाली तर ते सीमा ओलांडतील असे जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. त्यावर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी जावेद अख्तर यांच्यावर टीका करत जावेद अख्तर यांनी आपले विधान मागे घ्यावे असे म्हटले आहे.

आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे असल्याचे वक्तव्य ज्येष्ठ लेखक जावेद अख्तर यांनी केले असून हे वक्तव्य सर्रास चुकीचे असल्याची प्रतिक्रिया भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी दिली आहे. यापुढे असे वक्तव्य केल्यास त्यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल करण्याचा इशारा सुद्धा अतुल भातखळकर यांनी दिली आहे.

“आरएसएस आणि विश्व हिंदू परिषद सुद्धा तालिबानी मानसिकतेचे आहेत हे जावेद अख्तर यांचं विधान म्हणजे केवळ बेशरमपणाचा कळस नसून समस्त हिंदू समाजाचा अपमान आहे. जावेद अख्तर हे विसरत आहेत की, या हिंदू समाज बहुसंख्य असलेल्या देशात राहून ते तालिबानवर टीका करत आहेत. हिंमत असेल तर अफगाणिस्तानमध्ये जा आणि तालिबानवर टीका करा. त्यामुळे जावेद अख्तर आपलं विधान मागे घ्या. हिंदू समाजाची क्षमा मागा नाहीतर तुमच्या विरोधामध्ये बदनामीचा खटला केला जाईल,” असे अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.

देशातील अवघे काही मुस्लीमच तालिबानच समर्थन करत असल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटले होते. तालिबानचे समर्थन करणाऱ्यांबद्दल ते म्हणाले, “मला त्यांची वक्तव्य लक्षात नाही मात्र अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्याचं त्यांनी समर्थन केलंय. पण समर्थन करणारे हे देशातील काही मोजकेच मुसलमान आहेत. मी ज्या अनेक मुस्लीमांशी बोललो त्यांना समर्थन करणाऱ्यांची वक्तव्य ऐकून धक्काच बसला. आज भारतातील बहुतेक तरुण मुस्लीमांना चांगली नोकरी आणि त्यांच्या मुलांना चांगल्या शाळेत चांगलं शिक्षण मिळावसं वाटतं. तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे या पुरोगामी विचारांचं समर्थन करत आहेत. जिथे स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव केला जातो अशा पुरोगामी विचारांना ते प्रोत्साहन देत आहेत.”

हेही वाचा >> तालिबानचे समर्थन करणाऱ्या मुस्लिमांना नसीरुद्दीन शाह यांनी झापलं, म्हणाले…

भारत कधी तालिबानी देश बनू शकत नाही

हा देश मुळात धर्मनिरपेक्ष देश आहे. इथली बहुसंख्य लोकसंख्या धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे तालिबान्यांच्या विचारसणीचा भारतीयांवर प्रभाव पडणार नाही. भारत कधीही तालिबानी देश बनू शकत नाही असं जावेद अख्तर यांनी एनडी टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. “ज्याप्रमाणे तालिबानने अफगाणिस्तानमध्ये एका आठवड्यामध्ये उद्रेक करत सत्ता मिळवली ते पाहता हे पूर्व नियोजित असल्यासारखं वाटतंय. अमेरिका सरकार आणि तालिबान यांचा डाव असल्याचं हे वाटत आहे.” असे जावेद अख्तर म्हणाले.