राज्यातील मंदिरं खुली करण्यावरून मंगळवारी बराच गोंधळ बघायला मिळाला. मंदिरं खुली करण्यासाठी भाजपाचं आंदोलन सुरू असतानाच राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत हिंदुत्वाच्या मुद्यांवरून चिमटा काढला. त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तरही दिलं. मात्र, या ‘हिंदुत्व’ वादावरून अनेकांनी राज्यपालांवर नाराजी व्यक्त केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनीही राज्यपालांच्या पत्रावर भूमिका मांडत प्रश्न उपस्थित केला.

मंदिरं खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शाब्दिक चकमक झाली. राज्यपालांनी हिंदुत्वाच्या मुद्यावरून डिवचल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रातून फटकारे मारत राज्यपालांना उत्तर दिलं. मात्र, राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरून नाराजीचा सूर उमटला आहे.

आणखी वाचा- “राज्यपालांची पत्रातील भाषा वाचून…”; शरद पवारांनी थेट मोदींना लिहिलं पत्र

जितेंद्र आव्हाड यांनीही ट्विट करून राज्यपालांनी पाठवलेल्या पत्रावरून नाराजी व्यक्त केली आहे. “कुठल्याही धर्माची प्रार्थनास्थळं उघडायला सरकारने अनुमती दिलेली नाही. मा. राज्यपालांनी यात हिंदुत्वाचा मुद्दा का निर्माण करावा हे कळत नाही,” अशी शंका आव्हाड यांनी उपस्थित केली आहे.

आणखी वाचा- गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलंय का?; बाळासाहेब थोरातांचा कोश्यारींना सवाल

‘‘हिंदुत्ववादी असूनही गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील देव-देवतांना टाळेबंदीत ठेवण्यात आले आहे. प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याबाबत तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत की तुम्ही अचानक धर्मनिरपेक्ष बनला आहात?’’ असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे विचारला होता. त्यावर ‘‘तुम्हाला घटनेतील धर्मनिरपेक्षता मान्य नाही का?’’ असा सडेतोड प्रतिसवाल करत मुख्यमंत्र्यांनी “माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,” असं राज्यपालांना ठणकावलं होतं.