राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहेत. त्याचबरोबर आजारावर मात करून घरी परतणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठी आहे. विरोधी पक्षांकडून करोना रुग्णांच्या आकडेवारीविषयी वेळोवेळी भाष्य केलं जात आहे. विरोधकांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवरून जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या १४ जूनपर्यंत १ लाख ७ हजार ५८ इतकी झाली. रविवारी दिवसभरात राज्यात ३ हजार ३९० रुग्ण आढळून आले. राज्यातील करोनाग्रस्त रुग्णांच्या आकडेवारी विषयी विरोधकांकडून वेळोवेळी टीका केली जात आहे. विरोधकांच्या या टीकेवर राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी समाचार घेत संताप व्यक्त केला.

“महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आजपर्यंतचा १ लाखाचा आकडा आवर्जून सांगतात. पण त्यातील ५० हजार पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत, हे सांगायचं आवर्जून टाळतात. हा साधा चावटपणा नाही, हा भलामोठा कट आहे. गुजरातचा मृत्युदर सांगा की!,” असा सवाल आव्हाड यांनी केला आहे.

चार दिवसांपासून आलेख वाढता

राज्यात ९ जून रोजी दिवसभरात २,२५९ इतके रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर राज्यातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. १० जून रोजी राज्यात एका दिवसात ३,२५४ बाधित रुग्ण आढळून आले. ३ हजारांच्या सरासरीतच रुग्ण आढळन येत आहेत. ११ जून रोजी ३,६०७ रुग्ण आढळून आले होते. १२ जून रोजी ३,४९३ रुग्ण आढळून आले, तर १३ जून रोजी ३,४२७ रुग्ण आढळून आले. आतापर्यंत ५०,९७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ५३ हजार १७ इतकी आहे.

Story img Loader