डॉ. लोया यांचे शवविच्छेदन करणारे डॉ. व्यवहारे हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यामुळे त्यांची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
लोया प्रकरणात गुरुवारी सुप्रीम कोर्टाने चौकशीची गरज नाही, असा निर्णय दिल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी लोया प्रकरणावरुन भाजपावर गंभीर आरोप केले. लोया प्रकरणात नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये ज्यांच्या अधिकारात शवविच्छेदन अहवाल तयार केला ते डॉ. व्यवहारे हे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे जवळचे नातेवाईक आहेत. २०१५ मध्ये डॉ. व्यवहारे शवविच्छेदन अहवाल बदलतात असा आरोप त्यांच्याच विदयार्थ्यांनी केला होता. २०१४ मध्येही त्यांनी अहवाल बदलला नसेल हे कशावरुन ठरवायचे. त्यामुळे डॉ.व्यवहारे यांची नार्को टेस्ट करावी त्यात सत्य समोर येईल अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली.
महाराष्ट्र खरंच हागणदारीमुक्त झाला का?
सरकारने हागणदारीमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी ४ हजार ७१ कोटी रुपये खर्च केले. परंतू ही सत्य परिस्थिती नाही. त्यामुळे सरकारने महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला याची कोणत्या पातळीवर तपासणी केली आणि तसे ऑडिट केले का? असा सवाल मल्लिक यांनी सरकारला विचारला. युपीए सरकार असताना निर्मल भारत योजना आणली. राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या नेतृत्वात राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाने व्यापक स्वरुप घेतले. मात्र आता सरकार फक्त दिखावा करते आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.
कैलास गिरवले यांच्या मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करा
अहमदनगर दुहेरी हत्याकांडामध्ये मुद्दाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप आणि त्यांच्या वडिलांना गोवण्यात आले, असा आरोप मलिक यांनी केला. पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड झाली. त्यासंदर्भात राष्ट्रवादीचे नगरसेवक कैलास गिरवले यांना ८ एप्रिलला अटक करण्यात आली. त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली. त्यांच्यावर आणखी खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. यादरम्यान त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तीन दिवस ते पोलिस कोठडीत होते. त्यांच्या मृत्यूसाठी पोलीस निरीक्षक दिलीप पवार, देवीदास कर्डीले, गुट्टे आणि शिपाई काळे हे गिरवले जबाबदार असून त्यांना तत्काळ निलंबित करुन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.