लक्ष्मण राऊत
तूर खरेदीच्या प्रश्नावरून शेतकऱ्यांबद्दल उच्चारलेले आक्षेपार्ह शब्द त्याचप्रमाणे अन्य काही वक्तव्यांमुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी टीकेचे धनी झालेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे निवडणुकीनंतर मात्र स्वत:च्या एकूणच भाषेवरून आक्रमक पवित्र्यात आहेत. ज्या भागातून निवडून आलो आहोत तेथील बोलीभाषेत आपण बोलत असू तर त्यात गैर काय, असा प्रतिसवाल आता दानवे करीत आहेत.
जायकवाडीची खोली आणि दानवेंची बोली ही मराठवाडय़ाची ओळख असल्याचा उल्लेख नांदेड येथील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात झाला होता. सध्या दानवे या वाक्यावर बेहद खूश आहेत. ‘साले हा शब्द स्वत:च्या गावाकडे आणि मराठवाडय़ात सर्रास उच्चारला जातो. रागावल्यावर वडीलही मला साल्या म्हणायचे. या शब्दामुळे माझ्यावर टीका झाली. परंतु ती करणाऱ्यांना मराठवाडय़ातील बोलीभाषेची माहिती नसावी’ अशी भूमिका दानवे यांनी आता घेतली आहे.
स्थानिक पातळीवरील पत्रकारांशी संवाद असो की, वृत्तवाहिन्यांवरील कार्यक्रम असो, एखादा नकोसा प्रश्न आला की दानवे त्यावर आक्रमकरीत्या प्रतिप्रश्न करतात. स्वत:च्या मनात जे काही असेल ते बिनदिक्कत बोलतात. तुम्ही अमुक प्रश्न का विचारत नाहीत? विकासकामांबद्दल का बोलत नाही, असे प्रश्न आता तेच पत्रकारांना विचारतात.
दानवे मैफिलीचे आणि गोष्टीवेल्हाळ पुढारी म्हणून ओळखले जातात. चार माणसे जमवावीत आणि खरे तसेच काल्पनिक किस्से सांगून हास्यकल्लोळ उडवावा, हा त्यांचा स्वभाव. जाहीर सभांत स्वत:च्या शैलीत आणि भाषेत बोलावे, दैनंदिन जीवनातील चपखल उदाहरणे देत ऐकणाऱ्यांवर ताबा मिळवावा आणि त्यांच्या आनंदात स्वत:ही डुंबावे, ही बाब जालना जिल्ह्य़ात दानवेंसाठी नेहमीचीच! प्रदेश भाजपची बैठक असो की मतदारसंघातील छोटा कार्यक्रम असो, भाषा आणि कथनशैली बदलायची नाही यावर त्यांचा कटाक्ष! जालना जिल्ह्य़ात परिचित असणारी त्यांची वक्तृत्वशैली ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर उभ्या महाराष्ट्रास माहीत झाली.
पक्षीय व्यासपीठावरील प्रचारकी भाषण निरस आणि कंटाळवाणे होऊ न देता विनोदाच्या अंगाने नेणेही दानवेंना जमते. अनेकदा ते भाषणात अतिशयोक्ती करतात, काल्पनिक उदाहरणे देतात हे ऐकणाऱ्यांनाही कळत असते. परंतु उदाहरणांच्या सत्य-असत्याच्या तपशिलात न पडता श्रोते मनमुराद हसून त्यांना दाद देतात. राजकीय विरोधक असो की खफामर्जी झालेली एखादी व्यक्ती असो, तिच्यावर कसे तुटून पडायचे किंवा त्याची कशी टर उडवायची याची कला दानवेंना चांगली अवगत आहे. प्रसंगावधान, समयसूचकता, शब्दफेक, चपखल उदाहरणे, भाषाशैली आणि आत्मविश्वासाच्या आधारे एखाद्या सभेचा ताबा घेण्याचे कसब त्यांच्यात आहे.
दोन वेळा विधानसभा आणि पाच वेळा लोकसभा अशा सलग सात निवडणुका जिंकणाऱ्या तसेच ३५-४० वर्षे जिल्ह्य़ाच्या राजकारणात स्वत:चे अस्तित्व टिकविणाऱ्या दानवेंच्या वक्तृत्व शैलीचा परिचय जिल्ह्य़ाबाहेर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावरच खऱ्या अर्थाने झाला. अनेकदा स्वत:च्या वक्तृत्वशैलीवर स्वत:च मोहीत होण्याच्या नादात त्यांच्याकडून भाषेची मर्यादा उल्लंघली जाण्याची उदाहरणेही आहेत.
राजकारणात किती आक्रमक व्हायचे आणि गरजेनुसार चार पावले मागे कशी घ्यायची याची पक्की जाण दानवेंना असून त्याचा अनुभव लोकसभा निवडणुकीच्या वेळी जनतेने घेतलेला आहे. राज्य आणि केंद्रातील सत्ता, पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील प्रचंड मताधिक्य यामुळे गेली चार-पाच वर्षे दानवेंचे शासन-प्रशासनातील महत्त्व वाढलेले आहे. पक्ष संघटना चालविताना येणारा अनुभव, विरोधी पक्षांशी होणारा संघर्ष, प्रसारमाध्यमांशी येणारा संबंध इत्यादी बाबींच्या पाश्र्वभूमीवर नवीन आणि आक्रमक दानवे सध्या दिसत आहेत. विशेषत: आपल्या भागातील बोलीभाषा संवाद साधण्यासाठी किती महत्त्वाची आहे, ते बाहेरच्यांना कळणार नाही, हे त्यांनी अनेकदा ठासून सांगितले आहे.