राज्यातील स्थानिकांना रोजगार मिळावा म्हणून महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडताना स्पष्ट केलं. तसेच असल्याचेही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

महाविकास आघाडी सरकारचा आज पहिला अर्थसंकल्प अजित पवार विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी शेतकरी, नोकरी व्यवसाय, शिक्षण यासारख्या क्षेत्रांसंदर्भात मोठ्या घोषणा केल्या. यावेळी राज्यातील बेरोजगारांना नोकऱ्या मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पवारांनी स्पष्ट केलं. राज्यातील बेरोजगारी कमी व्हावी म्हणून स्थानिकांना नोकरी देण्याचा कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा पवारांनी केली. “राज्यातील ८० टक्के नोकऱ्या या स्थानिकांना मिळाव्यात यासंदर्भात कायदा करणार आहोत,” असं पवारांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं.

उच्च तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी

उच्च तंत्रशिक्षणासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी देण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केलं. बरोजगारांना रोजगारक्षम बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून यासाठी सर्व प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. १० वी उत्तीर्णांनाही रोजगाराचं प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचं पवारांनी सांगितलं.

सर्व शाळांना इंटरनेटनं जोडणार

राज्यातील सर्व शाळांना इंटरनेटनं जोडण्यात येणार असल्याची घोषणा पवारांनी केली. “राज्यातील सर्व शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदांच्या शाळांचाही दर्जा वाढवणार आहे. मराठी माध्यमांच्या शाळांसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे,” असं पवारांनी सांगितलं.