कोल्हापुरातील निर्बंध अजिबात शिथील करणार नाही. उलट नियम पाळले जात नसतील तर अधिक कडक करण्यात येतील असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. आपल्या जिल्ह्यातील करोना कमी करण्यासाठी सहकार्य करावं असं आवाहन अजित पवार यांनी कोल्हापूरवासियांना केलं आहे. अजित पवार यांनी कोल्हापुरात करोनास्थितीचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“निर्बधांच्या बाबतीत कोल्हापूर चौथ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पॉझिटिव्हीचं प्रमाण कोल्हापुरात आहे. यामुळे येथे निर्बंध अजिबात शिथील केले जाणार नाहीत. उलट कोणी नियम पाळत नसतील तर अधिक कडक केले जातील. आम्ही निर्बंध लादण्यासाठी येत नाही. पण कोल्हापूरने लवकरात बाहेर पडावं यासाठी थोडा वेळ सोसावं लागणार आहे. सकाळी मी अनेकांना मास्कविना पाहिलं. काही जण मास्कऐजी रुमाल वापरतात आणि पोलीस दिसले की तो रुमाल लावतात, असं करु नका, तुम्ही आपलं आरोग्य धोक्यात घालत आहात, निष्पापांनाही याचा फटका बसत आहे. पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना निर्बंधांची कडकपणे अमलबजावणी करण्यास सांगितलं आहे,” असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.

Maharashtra Lockdown:…तर राज्यात पुन्हा नव्याने निर्बंध; ठाकरे सरकारचा इशारा

“महाराष्ट्रात सध्या दुसरी लाट ओसरत असताना कोल्हापुरात प्रमाण जास्त आहे. कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. पहिल्या लाटेत काम उत्तम झालं होतं. पण सध्या करोना आटोक्यात नाही त्याची काय कारणं आहेत; औषध, लसींचं परिस्थिती याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. लोकप्रतिनीधांशी चर्चादेखील केली. आज या दौऱ्यात येत असताना गृह विलगीकरण कमी करुन संस्थात्मक विलगीकरण झालं पाहिजे यावर भर दिला. फायर, ऑक्सिजन ऑडिट सुरु आहे. लहान मुलांसाठी टास्क फोर्स सुरु करण्यात आलं आहे,” अशी माहिती अजित पवारांनी यावेळी दिली.

…तर कठोर निर्णय घ्यावे लागतील

जिल्हा प्रशासन, आरोग्य विभागात काही त्रुटी दिसल्या का असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांनी त्यांच्या वतीने प्रयत्न केला. त्यांच्याकडूनच आपल्याला काम करुन घ्यायचं असून नाउमेद करुन चालणार नाही. म्हणूनच त्यांना काय अडचणी आहेत ते सागंण्यास सांगितलं आहे. आम्ही सुविधा देतो पण पहिल्या लाटेत केलं तसं आक्रमकपणे काम आत्ता काम केलं पाहिजे आणि लोकप्रतिनिधींनीही सहकार्याची भूमिका घेतली पाहिजे असंही सांगितलं आहे. तरीही फरक पडला नाही तर ज्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांनी पार पाडली नाही तर कठोर निर्णय घ्यावे लागतील”.

आणखी वाचा- Corona Vaccination : ‘या’ तारखेपर्यंत राज्यातील सर्वांचं लसीकरण पूर्ण करण्याचं लक्ष्य; अजित पवारांनी दिली माहिती

खासगी रुग्णालयांनी नियमाप्राणे बिलं लावावीत

“टेस्टिंग दीड ते दुप्पट वाढलं पाहिजे असं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं आहे. टेस्टिंगनंतर रुग्णसंख्या सुरुवातीला वाढली तरी चालेल पण नंतर ते कमी होईल. टेस्टिंग न झाल्याने लोक बाहेर फिरत असतात, त्यामुळे इतरांनाही संसर्ग होतो त्यामुळे वाढवणं गरजेचं आहे,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं, दरम्यान खासगी रुग्णालयांनी नियमाप्राणे बिलं लावावीत, कारण नसताना जास्त बिल लावू नये अशी सूचनाही दिली असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

१ जुलैनंतर लस मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल

५ जुलैला पावसाळी अधिवेशन असून पुरवणी मागण्या घेतल्या जातील. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या मानधनाचा मुद्दा घेणार असून ते लवकरात लवकर दिलं जाईल असं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिलं. तसंच सिरम आणि भारत बायोटेकने लसनिर्मिती वाढवली असून १५ जूननंतर किंवा १ जुलैनंतर लस मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होईल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे.

छत्रपती शाहू महाराज भेट

छत्रपती शाहू महाराज भेटीवर बोलताना ते म्हणाले की, “चहाच्या निमित्ताने मी गेलो होतो त्यामुळे अनेक विषयांवर चर्चा झाली”. मराठा आरक्षणावर सुप्रीम कोर्टाने निर्णय़ दिला आहे. मोदींपुढेही हा मुद्दा मांडला होता. आमची काय मागणी होती तेदेखील सांगितलं होतं. आरक्षणाच्या संदर्भात बिल आणून ते मांडून कायदा करावा अशी विनंती केली होती असंही यावेळी ते म्हणाले.

नाना पटोले यांना फटकारले

“राज्यातील निवडणुकीबाबतचा अंतिम अधिकार काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना आहे. त्यामुळे कोणी काही विधान करत असेल तर त्याला महत्त्व नाही,” असं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. निवडणुका स्वबळावर निवडणूक लढवण्याचे विधान करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मताला त्यांनी महत्त्व नसल्याचे अधोरेखित केले.

जीएसटी वरून चंद्रकांत पाटलांना टोला

जीएसटी मंत्रिमंडळाकडे पाठपुरावा केल्यानंतर करोना वैद्यकीय साहित्यामध्ये सवलत मिळाली, असा उल्लेख करुन पवार म्हणाले केंद्र शासनाकडून जीएसटीचा परतावा राज्याला २३ हजार कोटी रुपये मिळणे बाकी आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आम्ही मंत्रिमंडळात असल्याने खरी आकडेवारी आमच्याकडे उपलब्ध आहे. केंद्र शासनाने जीएसटीची रक्कम दिली असताना राज्य शासनाने ओरड करू नये असे चंद्रकांत पाटील यांचे म्हणणे हे अज्ञानातून आलेले आहे. त्यांना वास्तवातील आकडेवारी माहीत नसल्याने ते काहीही बोलतात. विनाशकाले विपरीत बुद्धि अशी त्यांची अवस्था झाली आहेत, असा टोला त्यांनी लगावला.