करोना संकटामुळे अर्थव्यवस्था कोलमडली असून बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान ठाकरे सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून यानिमित्ताने राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.
अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्रात १२ हजार ५०० पदांसाठी पोलीस भरती कऱण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या इतिहासात इतकी मोठी भरती होणार आहे. पोलीस भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु केली जाणार आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण भागातील तरुण आणि तरुणांनी पोलीस खात्यात भरती होण्याची संधी मिळणार आहे”.
Maharashtra government has decided that 12,500 more police personnel will be recruited in the state police: State Home Minister Anil Deshmukh pic.twitter.com/UILgQsQfUH
— ANI (@ANI) September 16, 2020
करोनामुळे एकीकडे अर्थव्यवस्था कोलमडली असताना नोकरीच्या संधी कमी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय नोकरीची संधी शोधणाऱ्या राज्यातील तरुण-तरुणींना दिलासा देणारा आहे. याआधी पोलीस दलात १०,००० जागांची भरती करण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं. अजित पवार यांनी जुलैमध्ये तशी माहिती दिली होती. “राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलीस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलीस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,” अशी माहिती त्यांनी दिली होती.