गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाययोजना; दोन-तीन दिवसांत नियमावली
मुंबई : गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या काळातील संभाव्य गर्दी टाळण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सवांच्या मंडपात दर्शन घेण्यास बंदी, पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव, रात्रीची संचारबंदी असे काही निर्बंध लागू करण्यात येणार असून, याबाबतची नियमावली दोन-तीन दिवसांत जाहीर करण्यात येण्याचे संकेत आहेत.
राज्यात करोना संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. मुंबईसह अन्य शहरांत दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ नोंदविण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या काळात संसर्ग अधिक वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. गेल्या वर्षीही सणासुदीनंतरच रुग्णसंख्या वाढली होती. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध लागू के ले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत आगामी सणासुदीच्या काळात होणारी गर्दी कशी टाळता येईल, यावर चर्चा करण्यात आली.
गेल्या आठवडय़ापासून राज्यातील बहुतांश शहरांमधील बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणावर गर्दी झाली आहे. काही कठोर पावले उचलली नाही तर गणेशोत्सवाच्या काळात गर्दी वाढेल व संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यातूनच काही निर्बंध लागू के ले जातील. गौरी-गणपती विसर्जनानंतर अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सवाला भेट देणाऱ्यांची गर्दी वाढते. त्यामुळे गौरी-गणपती विसर्जनानंतर जमावबंदी व रात्रीची संचारबंदी लागू करण्याची सरकारची योजना आहे. त्यानुसार पाच किं वा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. रात्री बाहेर पडण्यावर निर्बंध लागू के ले जाणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडपांमध्ये दर्शन बंद के ले जाईल. परिणामी मंडपांमध्ये गर्दी होणार नाही. महानगरपालिकांना या संदर्भातील आदेश काढण्यास सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सवाबाबत लवकरच मुख्यमंत्री नियमावली जाहीर करणार असल्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात रात्रीची संचारबंदी तसेच उपाहारगृहे, दुकानांच्या वेळा कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचे संके तही त्यांनी दिले.
गणेशभक्तांच्या नाराजीची धास्ती
गणेशोत्सवाच्या काळात कठोर निर्बंध लागू के ल्यास गणेशभक्तांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. त्यावरून भाजप व मनसेकडून वातावरण तापविले जाऊ शकते. हा विषय संवेदनशील असल्याने घाईघाईत कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे सांगण्यात आले. दीड दिवसांचे गणपती की गौरी-गणपती विसर्जन झाल्यावर निर्बंध कठोर करायचे याबाबत सरकारच्या पातळीवर विचार सुरू आहे. दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन होईपर्यंत शक्यतो निर्बंध लागू करू नये, असाच साऱ्यांचा सूर आहे. गौरी-गणपती विसर्जनानंतरच लोक सार्वजनिक गणपतींच्या दर्शनासाठी बाहेर पडतात. त्यावेळी निर्बंध कठोर करण्याचा विचार सुरू आहे.
सरकारआधी नागपूरच्या पालकमंत्र्यांना घाई
तिसरी लाट थोपवण्यासाठी निर्बंध कठोर करण्याबाबतची नियमावली जाहीर होण्याआधीच नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी सायंकाळी तातडीने पत्रकार परिषद घेतली. शहरात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवून दोन- तीन दिवसांनंतर पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्याची घोषणा त्यांनी केली. राऊत यांनी ८ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांनी जाहीर करण्यापूर्वीच नागपुरातील खासगी शिकवणी वर्ग व दुकानांच्या वेळेत वाढ करण्याची घोषणा केली होती.
ठाणे जिल्ह्यातही चिंता
’गेल्या काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येमध्ये पुन्हा वाढ नोंदवण्यात येत आहे. जिल्ह्यात ३ आणि ४ सप्टेंबरला दैनंदिन रुग्णसंख्येने ३०० चा टप्पा ओलांडला होता.
’सोमवारी जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट नोंदविण्यात आली असून, दिवसभरात २१२ रुग्ण आढळले. मात्र, ही रुग्णसंख्याही ऑगस्टअखेरच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक आहे.
’ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, बदलापूर या भागांत रुग्णवाढीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. ठाणे शहरात काही दिवसांपूर्वी रोज ४० च्या आसपास रुग्ण आढळून येत होते.
’त्यात आता वाढ झाली असून दररोज ६० रुग्ण आढळून येत आहेत. शुक्रवारपासून कल्याण, डोंबिवलीतही करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.
यंदा मुखदर्शनही नाही..
मुंबई : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेशमूर्तीचे यंदा मुखदर्शनही घेता येणार नाही. के वळ ऑनलाइन दर्शनाचीच सुविधा देण्यात येणार आहे. लालबाग, परळमधील काही प्रमुख गणेशोत्सव मंडळांबरोबर पालिका व पोलीस अधिकाऱ्यांची सोमवारी बैठक झाली. त्यावेळी ऑनलाइन दर्शन देण्याच्या मुद्यावर चर्चा झाली. लालबाग, परळमधील गणेशमूर्तीचे दर्शन हा भाविकांसाठी श्रद्धेचा विषय असतो. मात्र, त्यामुळे होणारी गर्दी ही करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळणे आवश्यक आहे, याचा पालिका व पोलीस यंत्रणेने पुनरुच्चार के ला.