शासकीय कामांसाठी विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, त्यासाठी खासगी कंपन्यांची नेमणूक केली जाणार आहे. यासंबंधी सामान्य प्रशासन विभागाने जीआर काढला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना शासकीय कामासाठी तातडीने प्रवास करायचा असेल सरकारी विमानांची कमतरता आहे. तसेच लहान विमाने भाड्याने घेण्याची गरजही सरकारने व्यक्त केली आहे.

यासंदर्भात ई-निविदाही काढण्यात आलेल्या आहेत. या निविदांतर्गत नेमणूक होणाऱ्या दोन खासगी कंपन्या सरकारला विमाने आणि हेलिकॉप्टर भाड्याने घेण्यास मदत करणार आहेत. यामुळे व्हीव्हीआयपींच्या प्रवासाला विलंब होणार नाही. राज्याने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीने याबाबतीत राज्याच्या मुख्य सचिवांची भेट घेऊन चर्चा केली होती, असे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे. या भाड्याने घेण्यात येणाऱ्या विमानाचे भाडेही प्रचंड आहे. ६ ते १५ जणे बसू शकणाऱ्या या विमानाचे आणि हेलिकॉप्टरचे ताशी भाडे ९९,९९९ ते १,७८,५०० रूपये असते. सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या या जीआरमुळे हवाई वाहतूक संचालनालयाला दोन खासगी कंपन्यांसोबत वाटाघाटी करायची परवानगी मिळणार आहे. या वाटाघाटीअंतर्गत या दोन खासगी कंपन्यांशी केलेला करार दोन वर्षांसाठी म्हणजेच २०१८ अखेरीपर्यंत असणार आहे. या जीआरमध्ये म्हटल्याप्रमाणे सरकारने २२ लहान विमानांची निवड केली आहे. या विमानांची प्रवासी संख्या ६ ते १५ एवढी आहे. या २ विमानांमध्ये एका एअर अॅंब्युलन्सचाही समावेश आहे. या दोन खासगी कंपन्या या स्वरूपाची विमाने भाड्याने पुरवणार आहेत.