राज्यात करोनाविरोधातील लढा युद्धपातळीवर सुरू आहे. करोनाग्रस्त रुग्णांना बरं करण्यासाठी डॉक्टर रात्रंदिवस मेहनत घेत असून, डॉक्टरांच्या या करोनाविरोधातील लढाईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं मोठं आर्थिक बळ दिलं आहे. राज्य सरकारनं बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात वाढ करण्याबरोबरच कंत्राटी डॉक्टरांचे आणि बंधपत्रित डॉक्टरांचं मानधन समान करण्याचा निर्णय घेतला आहे.
बंधपत्रित आणि कंत्राटी डॉक्टरांच्या मानधनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोठा निर्णय घेतला. बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधना वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर राज्यात कंत्राटी पद्धतीनं कार्यरत असलेल्या डॉक्टरांनाही सरकारनं दिलासा दिला आहे. कंत्राटी डॉक्टरांचं आणि बंधपत्रित डॉक्टारांचं मानधन समान करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला.
बंधपत्रित (बॉण्डेड) डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला जाहीर. कोरोनाविरुद्धच्या लढाईला यामुळे निश्चितपणे बळ मिळणार; डॉक्टर्सनासुद्धा यामुळे प्रोत्साहन मिळणार. pic.twitter.com/Qkzd9GmdOE
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 29, 2020
मानधनात किती होणार वाढ?
करोनामुळे राज्यातील आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असला, तरी राज्य सरकारनं डॉक्टरांना प्रोत्साहन देण्यासाठी बंधपत्रित डॉक्टरांच्या मानधनात घसघशीत वाढ केली.
१) वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टरांना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार
२) आदिवासी भागातील बंधपत्रित विशेषज्ञ डॉक्टरांना ७० हजार ऐवजी ८५ हजार
३) इतर भागातील एमबीबीएस डॉक्टरांना ५५ हजारांऐवजी ७० हजार
४) इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टरांना ६५ हजारांऐवजी ८० हजार रुपये मानधन देण्यात येईल