राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या चर्चेत असून औरंगाबाद दौऱ्यातील एक फोटो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या फोटोमध्ये अनिल देशमुखांसोबत तीन गुन्हेगार उपस्थित असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. अनिल देशमुख यांच्यासोबत असणाऱ्या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल असल्याने या फोटोवरुन आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनिल देशमुख गृहमंत्री असल्याने याकडे अधिक गांभीर्याने पाहिलं जात आहे. दरम्यान अनिल देशमुख यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

“मी औरंगाबादला दौऱ्यावर गेलो होतो. दौऱ्यावर गेल्यानंतर हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात. अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण अवश्य यापुढे दक्ष राहीन,” असं अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

अनिल देशमुखांचा जो फोटो व्हायरल झाला आहे त्यामध्ये कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांचा समावेश आहे. या तिघांवरही गंभीर गुन्हे दाखल आहेत. यातील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत.

कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर यांच्यावर औरंगाबाद शहरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. सय्यद मतीन याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो जेलमध्येही होता. सय्यद मतीन याची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली आहे. तर कलीम कुरेशी याची औरंगाबाद शहरात गुटखा किंग म्हणून ओळख आहे.