महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने देशातील सर्व राज्यांच्या शिक्षण मंडळांना ३१ जुलै पर्यंत बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजेच सीबीएसईने शुक्रवारी दुपारी २ वाजता १२ वीचा निकाल जाहीर केला होता. मात्र अद्याप राज्याच्या शिक्षण मंडळाने शेवटचा दिवस असतानाही अद्याप निकालाबाबत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आज तरी बारावीचा निकाल जाहीर होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, निकालासंदर्भात महत्वाची माहिती पुढे आली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षा २०२१ साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या वर्षी बारावीची परीक्षा करोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. त्यापूर्वी २०१९ मध्ये परीक्षेसाठी प्रवेश होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत ३ एप्रिल रोजी ऑनलाइन प्रवेश पत्र देण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व उच्च माध्यमिक शाळांनी तसेच कनिष्ठ महाविद्यालय यांनी सर्व विद्यार्थ्यांना त्यांचे बैठक क्रमांक दिले आहेत. काही विद्यार्थ्यांना त्यांची बैठक क्रमांक अवगत झाले नसल्यास अशा विद्यार्थ्यांना मंडळाच्या संकेतस्थळावर सदरची माहिती उपलब्ध करून दिली आहे.

कसा पाहाल आपला बैठक क्रमांक

  • मंडळाच्या http://mh-hsc.ac.in/  या वेबसाईटवर जा.
  • वेबसाईट ओपन झाल्यानंतर तिथे आपला जिल्हा, तालुका सिलेक्ट करा.
  • खालील टॅबमध्ये आधी आडनाव नंतर आपलं नाव मग वडिलांचं नाव अशी माहिती भरा.
  • इंटर केल्यानंतर आपला रोल नंबर आपल्याला दिसेल

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाचा आराखडा शिक्षण विभागाने जाहीर केला होता. मूल्यमापनासाठी विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावीतील गुण आणि बारावीच्या वर्षांतील कामगिरी ग्राह्य़ धरण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यमंडळाला अवघ्या २८ दिवसांत निकालाची प्रक्रिया पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सीबीएसईसहीत देशातील सर्व शिक्षण मंडळांनी बारावीचा निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. कोर्टाने दिलेली वेळेची मर्यादा लक्षात घेता महाराष्ट्र शिक्षण मंडळ बारावी निकाल २०२१ जाहीर करण्यास आजचा शेवटचा दिवस आहे. यावर्षी महाराष्ट्र एचएससी परीक्षा २०२१ साठी साधारण १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या विद्यार्थ्यांचा निकाल अधिकृत वेबसाइट mahresults.nic.in वर जाहीर होणार आहे.