विधान परिषदेतील अमरावती, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज संस्थेच्या मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे. अमरावतीमध्ये भाजपाचे प्रवीण पोटे तर वर्धा येथे भाजपाचे रामदास आंबटकर विजयी झाले आहेत.

चंद्रपूर, वर्धा व गडचिरोली या तीन जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर पंचायत, ग्रामपंचायत व महानगरपालिका सदस्यांनी निवडणुकीत मतदान केले होते. यामध्ये जिल्हा परिषदेचे एकूण १९४, महानगरपालिका ७१, नगर पालिका ४७५, नगर पंचायत ३१९ असे एकूण १०५९ मतदार होते. भाजप व काँग्रेस अशी थेट निवडणूक असली तरी नगरसेवकांच्या नाराजीचा फटका नेमका कोणत्या उमेदवाराला बसतो, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत भाजपाकडून मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्र्यांपासून आमदार खासदारांपर्यंत सर्वच कामाला लागले होते. या निवडणुकीत रामदास आंबटकर यांवना ५२८ मते मिळाली. तर काँग्रेसचे इंद्रकुमार सराफ यांना ४९१ मते मिळाली. या निवडणुकीत एकूण १०१९ मते वैध ठरली. तर ३६ मते बाद ठरली. १ मतदाराने नोटाचा वापर केला. रामदास आंबटकर यांच्यासाठी ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांनी शेवटच्या क्षणी सूत्रे हाती घेत रचलेले डावपेच निर्णायक ठरल्याचे दिसते.

विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रवीण पोटे विरुद्ध काँग्रेसचे अनिल माधोगडिया यांच्यात लढत होती. या मतदारसंघात भाजपाचे २००, काँग्रेसचे १२८, राष्ट्रवादी काँग्रेसचे ४०, शिवसेनेचे २८, प्रहार, युवा स्वाभिमान, इतर पक्ष आणि अपक्ष मिळून ४८९ मतदार होते. यातील ४८८ जणांनी मतदान केले आहे. शिवसेना, प्रहार, युवा स्वाभिमान आणि काही अपक्षांनी पोटे यांना पाठिंबा दिल्याने त्यांचे पारडे जड मानले जात होते. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात पोटे यांनी बाजी मारली. अमरावतीमध्ये काँग्रेसची स्वत:ची १२८ मते होती. पण माधोगडिया यांना केवळ १७ मते मिळाली. या निवडणुकीत प्रवीण पोटे यांनी ४५८ मते मिळवून दणदणीत विजय मिळवला. या दोन्ही जागांवरील विजय भाजपासाठी महत्त्वाचे मानले जात आहे.