Maharashtra SSC 10th result 2018: राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल काही तासात जाहीर होणार आहे. निकालाचा दिवस म्हटलं की विद्यार्थ्यांबरोबर पालकांच्या मनातही धाकधूक सुरु आहे. एकीकडे निकालाची चिंता तर दुसरीकडे अकरावीत प्रवेश घेण्याची चिंता त्यामुळे सध्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक प्रकारचं दडपण आलेलं आहे. बहुतांश मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेताना इंग्रजी भाषेची भिती वाटत असते. याच भितीमुळे अनेक विद्यार्थी इच्छा असूनही चुकीच्या क्षेत्राकडे वळतात. मात्र इंग्रजी हा कठीण विषय आहे असा गैरसमज मनातून दूर केला तर इंग्रजी विषयातली खरं गम्मत समजायला लागेल.
आज इंग्रजीकडे जागतिककरणाची भाषा म्हणजेचं ‘वर्ल्ड लँग्वेज’ म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे अगदी कानाकोप्यापर्यंत इंग्रजी भाषेचा वापर सर्रास होताना दिसून येतो. प्रत्येक देशाची भाषा वेगवेगळी असते मात्र इंग्रजी ही अशी भाषा आहे जी सा-याच देशामध्ये अगदी सहज बोलली जाते त्यामुळे केवळ या भाषेमुळे देशातील माणसं एकमेकांना जोडून ठेवता येतात. मात्र ही भाषा सगळ्यांनाच बोलता येते किंवा समजते असं नाही. काही व्यक्ती अशाही आहेत ज्यांना इंग्रजी भाषेची विशेष भिती वाटते आणि याच भितीमुळे त्यांच्या मनात इंग्रजीविषयी गैरसमज निर्माण होतात. या गैरसमजामध्ये अजून एक भर असते ती म्हणजे महाविद्यालयातील शिक्षण हे संपूर्णपणे इंग्रजीमध्ये असतं. त्यामुळे याच भितीमुळे अनेक विद्यार्थी महाविद्यालयात जातांना घाबरतात. त्यांच्या मनात या भाषेविषयी न्युनगंड निर्माण होतो. मात्र विद्यार्थ्यांच्या मनातला हा न्युनगंड घालवणे गरजेचे आहे.

१. इंग्रजी वर्णमालेचा नीट अभ्यास करा
अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की इंग्रजी भाषा शिकायला फार कठीण आहे. मुळात ही भाषा कठीण नाही. तरीदेखील तिच्याबद्दल हा मोठा गैरसमज लोकांनी पसरवलेला आहे. इतर कोणत्याही भाषेतील वर्णमालेपेक्षा इंग्रजी वर्णमाला सोपी आहे. इंग्रजी भाषेत केवळ २६ मुळाक्षरं असून ती खूपच साधी आणि सुटसुटीत रितीने वापरली जातात. त्यातच या भाषेमध्ये मराठी भाषेप्रमाणे व्याकरणाचे नियमही कमी आहेत. इंग्रजीमधील व्याकरणही अगदी सोप्प आहे त्यामुळे या भाषेतील वर्णमालेचे नीट निरीक्षण केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर होईल. तसंच आपल्या चुका ओळखून त्या दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला मदत करू शकणाऱ्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक किंवा ओळखीच्या व्यक्तीची मदत घ्या.

२. केवळ इंग्रजीमुळेच नोकरी मिळते असं नाही
अनेक विद्यार्थ्याना असंही वाटतं की इंग्रजी बोलता आलं नाही तर चांगली नोकरी मिळणार नाही. मात्र असं अजिबात नाही. सहज संवाद साधण्यासाठी इंग्रजी येणं जरी आवश्य असलं तरी तरी या भाषेबरोबर तुमच्या अन्य गुण असणंही तेवढंच आहे. कोणतीही नोकरी केवळ इंग्रजी येतं म्हणूनच मिळते असं नाही. नोकरी मिळविण्यासाठी इंग्रजीच्या ज्ञानाबरोबर तुमच्यात अन्य गुण असणंही तितकचं महत्वाचं आहे. त्यामुळे इंग्रजी येणं हा आपल्या गुणवत्तेतील एक फायदेशीर मुद्दा ठरू शकतो.मात्र नोकरीसाठी इंग्रजी म्हणजे सर्वस्व आहे हा गैरसमज दूर करुन आपल्या व्यक्तीमत्वात भर घालतील किंवा आपला व्यक्तीमत्व विकास होईल अशा गोष्टीही शिका.

३. इंग्रजी बोलताना चूका होतात, लोक हसतील या भितीने इंग्रजीपासून लांब पळणे
अकरावीत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांसमोर अनेक पर्याय असतात.मात्र या सा-या पर्यायांमध्ये इंग्रजी हे मध्यस्थानी असते. त्यातच अकरावीला आपल्या वर्गात येणा-या सा-याच विद्यार्थ्यांना इंग्रजी चांगल्या प्रकारे बोलता येतं फक्त मलाच जमत नाही असा समज अनेक विद्यार्थी करतात. मग मी इंग्रजी बोलायला लागलो किंवा लागले आणि काही चुकलं तर सगळे मला हसतील हा समज करुन अनेक विद्यार्थी इंग्रजी बोलायचं टाळतात. मात्र चूका झाल्या तरी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्न करा कारण कोणताही विद्यार्थी जन्माला आल्यापासून इंग्रजी बोलत नसतो. इंग्रजी ही सरावाने येणारी भाषा आहे. रोज तुमच्या आवडीच्या विषयावर आधारित इंग्रजी लेख मोठ्याने वाचण्याचा प्रयत्न करा.

४. इंग्रजी सुधारण्यासाठी काय करता येईल
बोलतान,लिहीताना चुका होतील ही काळजी करु नका. सुरुवातीला नव्यानं ही भाषा शिकताना चुका या होणारच. त्यामुळे संयम राखा. इंग्रजी शिकणं केवळ एका दिवसात तर शक्य नाही. आत्मविश्वास येईपर्यंत छोट्या-छोट्या आणि सोप्या वाक्यांचा आधार घ्या. तसंच उत्तम इंग्रजी बोलणा-या व्यक्तीच निरीक्षण करा. त्यांची शैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. इंग्रजी पुस्तक आणि मासिक वाचत जा.