राज्यातील करोना संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज वाढणाऱ्या करोनाबाधितांबरोबर आता मृत्यूंच्या संख्येतही मोठी वाढ होताना दिसत आहे. राज्यात दिवसेंदिवस करोनाची वाढती रूग्ण संख्या पाहून सरकार देखील आता अधिकच कठोरपणे नियमांची अंमलबाजवणी करण्याच्या मानसिकतेत दिसत आहे. अनेक शहरांमध्ये तर लॉकडाउनला देखील सुरूवात झालेली आहे. आज दिवसभरात राज्यात ९२ रूग्णांचा मृत्यू झाला असून, २७ हजार १२६ नवीन करोनाबाधित आढळले आहेत.  सध्या राज्यातील मृत्यूदर २.१८ टक्के आहे.  राज्यात आजपर्यंत ५३ हजार ३०० रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

याशिवाय आज १३ हजार ५८८ करोनातून रुग्ण बरे देखील झाले. राज्यात आजपर्यंत एकूण २२,०३,५५३  करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८९.९७ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,८२,१८,००१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,४९,१४७ (१३.४४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,१८,४०८ व्यक्ती गृह विलगीकरणामध्ये आहेत तर ७  हजार ९५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण १,९१,००६  ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.