राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरत असल्याचे दिसत आहे. शिवाय, दररोज मोठ्यासंख्येने रूग्ण करोनातून बरे देखील होत आहेत. मात्र असे जरी असले तरी देखील अद्यापही करोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत रोज भर पडतच आहे. दररोज आढळणारी करोनाबाधितांची संख्या ही मागील काही दिवसांमध्ये करोनामुक्त झालेल्यांपेक्षा कमी आढळून येत आहे. आज दिवसभरात राज्यात ७ हजार ५१० रूग्ण करोनातून बरे झाले असून, ६ हजार ९१० नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. याशिवाय, आज १४७ करोनबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ६०,००,९११ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.३३ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आतापर्यंत १,३०,७५३ रूग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.०९ टक्के एवढा आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,५८,४६,१६५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२,२९,५९६ (१३.५९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,३५४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,९७७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, राज्यात आज रोजी एकूण ९४,५९३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.