राज्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत असली तर धोका टळलेला नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. या कालावधीत काही बाबींमध्ये सूट देण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता यासाठी वेगळी प्रशासकीय यंत्रणा असणार आहे. या भागातील नियमावली त्या त्या भागातील प्रशासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार कार्यरत असणार आहे. तर २९ मे पर्यंतचा करोनाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता पाहून पुढच्या १५ जूनपर्यंतची नियमावली आखली जाईल.

पॉझिटीव्हीटी दर १० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे आणि पालिकांसाठी खालीलप्रमाणे निर्बंध शिथिल करण्यात येतील

  • अत्यावश्यक सेवेतील दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी
  • सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा (केवळ एकल दुकाने, मॉल्स किंवा शॉपिंग सेंटर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील. तसेच शनिवार, रविवार ती बंद राहतील.
  • अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई-कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील.
  • दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील.
  • करोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जास्त उपस्थिती हवी असल्यास संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.
  • कृषीविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते

पॉझिटीव्हीटी दर २० टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

  • या जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.
  • दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही.
  • या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल.
  • आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.
  • उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक द चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.

मुख्यमंत्र्यांनी राज्यात १५ जूनपर्यंत निर्बंध कायम राहातील असे जाहीर केले. तसेच, जिल्ह्यांमधील करोना परिस्थितीचा आढावा घेऊन काही जिल्ह्यात निर्बंध आणखी कडक करावे लागतील, तर काही जिल्ह्यांमध्ये कदाचित निर्बंध शिथील केले जातील असं देखील सांगितलं.