२५ हेक्टर क्षेत्रात लागवड प्रकल्प हाती; वसई ते झाईदरम्यान ११ गावांत समन्वय समितीची स्थापना
नितीन बोंबाडे, लोकसत्ता
डहाणू : पालघर जिल्ह्य़ाच्या किनारपट्टीवर वसई ते झाईदरम्यान खारफुटीचे क्षेत्र विरळ होऊ लागल्याने कांदळवन संरक्षण आणि वाढीसाठी कांदळवन कक्षाने पालघर किनारपट्टीवर ११ गावांमध्ये विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. कांदळवन क्षेत्र वाढवले तर सागरी माशांचे प्रजनन वाढणार आहे. कांदळवन कक्षाकडून सागरी प्रजातींच्या वाढ तसेच पर्यावरणदृष्टय़ा जैवविविधतेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या खारफुटीची केळवे येथे रोपवाटिका तयार करून ऑक्टोबरमध्ये २५ हेक्टर क्षेत्रात लागवड करण्यात येणार असल्याची माहिती साहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिकेत शिर्के यांनी दिली. पालघर जिल्ह्य़ात खारफुटीच्या १९ प्रजाती आहेत. त्यापैकी रायजोरीया, मुकरोनाटा, शिरसात्सगल, बुगोरीया, सिलेट्रीका, खारफुटी अशा पाच प्रजातींची लागवड करण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्य़ात कांदळवन शाखेची ११ गावांमध्ये कांदळवन सहव्यवस्थापन समिती काम करीत आहे. या समितीमार्फत गट तयार करून कांदळवनाच्या जागेनुसार खेकडा पालन, जिराडा पालन, शोभिवंत मासे प्रकल्प राबवले जात आहेत. जागेची निवड करण्यासाठी तज्ज्ञ तसेच फिशरीजचे अधिकारी जागेची निवड करतात. समितीमार्फत गट तयार केले जातात ९० टक्के सबसिडी १०% सहभाग लागतो. जागेच्या निवडीसाठी किमान १ हेक्टर योग्य क्षेत्राची निवड होते.
सातपाटीमध्ये कांदळवन समन्वय समितीच्या गटांकडून शोभिवंत माशांचे तीन प्रकल्प सुरू आहेत. वैतरणा खाडी भागात दोन ते तीन स्पॉट अनुकूल आहेत. वैतरणा भागात खाजरी मासा बंदिस्त केस कल्चर, सी बीज पुरवण्यात आले आहेत. धाकटी डहाणू येथे जिताडा आणि शोभिवंत माशांचा प्रकल्प राबवला आहे. कांदळवनाचे क्षेत्राला रिझव्र्ह फॉरेस्टचे कायदा लागू होतो. या भागात कोणतेही काम करू शकत नसल्याने समिती स्थापन करण्यासाठी काही ठिकाणी विरोध होतो. कांदळवन कक्षासाठी रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई प्रत्येक जिल्ह्य़ात वन परिक्षेत्र अधिकारी नियुक्ती केली आहे. पालघर जिल्ह्य़ात झाई ते वसई एक वन परिक्षेत्र अधिकारी नियुक्त आहेत.वसई ते झाईदरम्यान कांदळवन क्षेत्र जास्त असल्याने मासळीचे समृद्ध क्षेत्र आहे. पालघर जिल्ह्य़ाच्या किनारपट्टीवर विविध प्रकल्प राबवल्यामुळे तिवरांची कत्तल झाली.
कांदळवन सागरी जैवविविधता टिकवून ठेवणारा महत्त्वाचा घटक आहे. सागरी प्रजातींची वाढ खारफुटीवर अवलंबून आहे. केळवे येथे कांदळवन कक्षाकडून खारफुटीची रोपवाटिका तयार करण्यात आली असून ऑक्टोबरमध्ये २५ हेक्टर क्षेत्रात कांदळवनाची लागवड करण्यात येणार आहे.
– अनिकेत शिर्के, उपजीविकातज्ज्ञ प्लांटेशन प्रकल्प साहाय्यक कांदळवन कक्ष
कांदळवन कक्ष पालघर शाखेने २९०० हेक्टर क्षेत्र लागवडी खाली आणण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. मागील दोन वर्षांत कांदळवन वाढीमुळे सागरी प्रजातींच्या वाढ झालेली आहे.
– मंजिरी केळम्स्कर, वनपरिक्षेत्र अधिकारी कांदळवन कक्ष पालघर