कर्जत : राज्य सरकारने आमच्या संयमाची परीक्षा न पाहता सरकारच्या हातामध्ये मराठा समाजासाठी जे करण्यासारखे आहे ते तातडीने करावे अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून पुणे ते विधान भवन हा लाखोंच्या उपस्थितीमध्ये मराठा मोर्चा काढू ,असा इशारा छत्रपती संभाजी महाराज यांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे बोलताना दिला.

उच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यामुळे ते मिळवण्यासाठी व पुन्हा एकदा मराठा समाजामध्ये एकजूट निर्माण करून या प्रश्नाची धग सरकापर्यंत पोहोचवण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभर दौरे करण्याचा निर्णय जाहीर केला असून याची सुरुवात त्यांनी आज कर्जत तालुक्यातील  कोपर्डीतील निर्भयाच्या स्मारकाला अभिवादन करून केली. यानंतर त्यांनी पीडितेच्या आई—वडिलांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली. या भेटीनंतर त्यांनी राज्यातून आलेल्या मराठा क्रांती मोर्चाचे  राज्यातील सर्व समन्वयक व कोपर्डी मधील ग्रामस्थ यांच्याशी कोपर्डीतील घटना व मराठा आरक्षण यासह इतर मागण्यांबाबत चर्चा करून आपली भूमिका जाहीर केली.

या वेळी मराठा क्रांती मोर्चाची कर्जतमधून प्रथम सुरुवात करणारे समन्वयक संजीव भोर पाटील, करण जायकर, अंकुश कदम,  विनोद साबळे, रघुनाथ चित्रे, गंगाधर काळकुटे , रमेश केरे, लालासाहेब सुद्रिक, सूर्यभान सुद्रिक, सतीश सुद्रिक, सकल मराठा समाजाचे कर्जत येथील समन्वयक काळे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक बोस, नीलेश तनपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले,की सन २०१७ साली या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र न्यायालयीन तरतुदीनुसार आरोपींना दोन वर्षांनंतर अपील करण्याची मुभा असल्यामुळे त्यांनी सन २०१९ साली उच्च न्यायालयामध्ये या खटल्यासंदर्भात अपील केले आहे. या खटल्याचा निकाल  सहा महिन्यांमध्ये जलदगती न्यायालयाने  द्यावा . या प्रकरणी आपण राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत.

चंद्रकांत पाटलांनी शिकवू नये – खा. संभाजीराजे

मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे. त्यामुळे माझी नेमणूक कोणाच्या सांगण्यावरून झालेली नाही, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी मला काही शिकवू नये. मी शाहू महाराजांचा वंशज आहे, असे उत्तर खा. संभाजीराजे छत्रपती यांनी कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे सांगितले. भाजपाचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील व खासदार संभाजीराजे यांच्यामध्ये सध्या वाक्युद्ध सुरू आहे. संभाजीराजे म्हणाले, की मराठा समाजाच्या हक्कासाठी मी सन २००७ सालापासून लढा देत आहे व हे सर्व जनतेला माहीत आहे, मात्र चंद्रकांत पाटील यामध्ये केव्हा आले हे मला तर काही आठवत नाही. मला कोणी शिकवू नये. जर देवेंद्र फडणवीस यांनी सल्ला दिला, तर मी त्यावर बोलेन .