काही दिवसांपूर्वीच आठवीच्या पुस्तकामध्ये गुजराती भाषेमध्ये धडे छापून आल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा राज्याच्या शिक्षण विभागाला गुजराती भाषेचा पुळका आला आहे. महाराष्ट्रातील मराठी शिक्षकांना ‘वंदे गुजरात’ या गुजराती भाषेतील वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याच्या तयारीला शिक्षण विभाग लागला आहे.
राज्यातील पहिली ते आठवीच्या अभ्यासक्रमात या शैक्षणिक वर्षापासून बदल करण्यात आला आहे. या बदललेल्या अभ्यासक्रमासंदर्भात वेगवेगळ्या विषयांच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. २४, २५ आणि २६ सप्टेंबर रोजी व्हर्चुअल माध्यमातून हे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण वर्गासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने दूरदर्शनच्या मालकीच्या ‘सह्याद्री’ मराठी वाहिनीला डावलून चक्क ‘वंदे गुजरात’ या गुजराती भाषेतील वाहिनीची निवड केली आहे.
या प्रशिक्षण वर्गांसंदर्भात शिक्षण विभागाने आदेशही जारी केले आहेत. महाराष्ट्रामध्ये ‘वंदे गुजरात’ ही वाहिनी दिसत नसल्याने शाळांनी डीश सेटटॉप बॉक्स बसवावा किंवा ज्यांना हे करणे शक्य नाही त्यांनी ‘जिओ टीव्ही’ अॅपमधून ‘वंदे गुजरात’ वाहिनी बघावी असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. ज्या शाळांकडे टीव्ही नाही त्यांनी इतर शाळांमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यावे असेही या आदेशात म्हटले आहे.
मात्र आता राज्यातील शिक्षकांना गुजराती वाहिनीवरून देण्यात येणारे प्रशिक्षण कोणत्या भाषेत असेल याबद्दल शिक्षकांना चिंता लागून राहिलेली आहे. मात्र शासनाचा आदेश असल्याने त्यांना त्याचे पालन करावे लागणार आहे. तरी राज्यातील गावागावांमध्ये दिसणाऱ्या दूरदर्शनच्या मालकीच्या ‘सह्याद्री’ मराठी वाहिनीला बगल देत राज्याच्या शिक्षण विभागाने गुजराती वाहिनीला झुकते माप का दिले याबद्दलची चर्चा शिक्षकांमध्ये रंगताना दिसत आहे. एका प्रकारे शिक्षकांबरोबर केलेला हा ‘विनोद’च असल्याचेही बोलले जात आहे.