मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे दहशतवाद्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला. परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्षप्रमुखांची संमती होती असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे.

पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव एकमताने संमत झाला. त्यात माझाही सहभाग होता असंही शरद पवार यांनी सांगितलं.

भारतीय सैन्याचा सर्वांना अभिमान आहे. भारतीय लष्कराचे सामर्थ्य जगाला ठाऊक आहे. १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धात व नंतर कारगिल युद्धात त्याची प्रचिती आली आहे. त्यामुळे पुलवामा घटनेनंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांच्या तळांवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती अतिरेकी ठार झाले याची चर्चा व्हायला नको असं मत शरद पवार यानी व्यक्त केलं आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर संरक्षण विषयक कारवाईचे राजकारण होऊ नये असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader