अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली असून, हा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. मनसेनं इशारा दिल्यानंतर अॅमेझॉनने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस बजावल्यानंतर मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे.”महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसं प्रत्युत्तर दिलंय याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील,” असं म्हणत मनसेनं नोटिसीनंतर गर्भित इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांना आज दिंडोशी न्यायालयाने नोटीस बजावली आहे. त्याचबरोबर न्यायालयात हजर राहण्याचेही आदेश देण्यात आले असून, या नोटिसीनंतर मनसेनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून याविषयी भूमिका मांडण्यात आली आहे. “व्यापारी संकेतस्थळांच्या तंत्रप्रणालीमध्ये इतर भारतीय भाषांप्रमाणे मराठीचाही अंतर्भाव करावा म्हणून मनसेने आग्रही पाठपुरावा केला. काहींनी सकारात्मक प्रतिसाद दिला, तर काहींनी चालढकल केली त्यात सणासुदीत कुणाच्याही व्यवसायाला फटका बसू नये म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी संयम बाळगला. पण त्यानंतरही महाराष्ट्रात व्यापार करताना ‘मराठीचा अंतर्भाव करायला आम्ही बांधिल नाही’ अशी मुजोरीची भाषा केली जाणार असेल आणि त्यासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर खटला भरला जाणार असेल तर महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसं प्रत्युत्तर दिलंय याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील. महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल!,” असा खणखणीत इशारा मनसेनं दिला आहे.
…महाराष्ट्र सैनिकांनी मुजोरांना कसं प्रत्युत्तर दिलंय ह्याचे इतिहासात दाखले आहेत आणि भविष्यात पाहायचे असतील तर पाहायला मिळतील.
महाराष्ट्रात व्यापारी राजवट खपवून घेतली जाणार नाही इथे फक्त मराठी माणसाचीच ‘राज’वट असेल! #सर्वत्रमराठी #मनसेदणका #महाराष्ट्रधर्म (३/३) pic.twitter.com/hRbAZaZQfZ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 24, 2020
काय आहे नेमका वाद –
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी मनसेने मोहीम सुरु केली होती. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी सात दिवसांत मराठी भाषेत अॅप सुरू करावं, अन्यथा दिवाळी मनसे स्टाईलने होईल असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला होता. यासाठी त्यांनी कंपन्यांच्या कार्यालयात जाऊन भेटही दिली होती. याशिवाय ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहिलेले बॅनर वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी परिसरात लावण्यात आले होते.