अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी सतत टीका आणि वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आहे. दरम्यान मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने कंगना रणौतविरोधात सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. बॉलिवूडसह मराठी सेलिब्रेटींनीही कंगनाच्या या वक्तव्याचा विरोध केला आहे. दुसरीकडे मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनीही कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली असून माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये असं म्हटलं आहे. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही अशी असंही ते म्हणाले आहेत.

आणखी वाचा- …कंगनाचं थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही; शिवसेना आमदाराचा इशारा

अमेय खोपकर यांनी ट्विट केलं असून त्यात म्हटलं आहे की, “माझ्या मुंबई पोलिसांबद्दल ‘जजमेंटल’ होऊन कुणीही ‘पंगा’ घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहेत माझे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ माझ्या मुंबई पोलिसांमुळे. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो…कशीचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते माझे मुंबई पोलीस. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला. पण माझ्या मुंबई पोलिसांबद्दल काही बरळेललं मीच काय, कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही”.

आणखी वाचा- धनंजय मुंडे म्हणतात, “कंगना कृतघ्न वागण्यामागे दोन कारणं असू शकतात, एक तर…”

आणखी वाचा- भाजपा आयटी सेल कंगनाच्या टीमचा भाग, काँग्रेसचा गंभीर आरोप

कंगनाने काय म्हटलं आहे?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली आहे. ट्विटमध्ये तिने लिहिलं आहे की, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि मी पुन्हा मुंबईत परत येऊ नये असं म्हटलं. या आधी मुंबईच्या रस्त्यांवर आझादीच्या मागण्या करणारे ग्रॅफिटी दिसत होते आणि आता तर मला उघडपणे धमक्या दिल्या जात आहेत. ही मुंबई मला पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”.