भूमिका बदलून काही लोक सत्तेत बसले असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. मनसेचा झेंडा बदलण्यात आला त्याबाबत राज ठाकरेंना औरंगाबादमध्ये प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी या प्रश्नाला उत्तर देताना “मी फक्त पक्षाचा झेंडा बदलला आहे. काही लोक तर भूमिका बदलून सत्तेत आले” असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.

एवढंच नाही तर “जे पक्ष आज स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेत आहेत, त्यांनी कधी भूमिका घेतली?” असाही प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. नव्या झेंड्याबद्दल कोणतीही नोटीस आली नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे तीन दिवस औरंगाबादमध्ये आहेत. शनिवारी ते मुंबईत परतणार आहेत. औरंगाबादमध्ये राज ठाकरेंचं आगमन होणार असल्याचं कळताच शहरांमधील प्रमुख चौकांमध्ये ‘हिंदू जननायक’ असा राज ठाकरेंचा उल्लेख करत बॅनर्स लावण्यात आली. याबाबत प्रश्न विचारला असता मला हिंदू जननायक म्हणू नका असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं.

आणखी वाचा – औरंगाबादचं नाव बदलले तर काय हरकत? – राज ठाकरे

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. विधानसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सगळ्यावर राज ठाकरे यांनी तेव्हा काहीही भूमिका मांडली नाही. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेनेला टोला लगावताना दिसत आहेत. त्याचीच प्रचिती औरंगाबादमध्येही आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

आणखी वाचा – हिंदू जननायक म्हणू नका – राज ठाकरे

शिवसेनेने सेक्युलर भूमिका स्वीकारत सत्तेत बसणं पसंत केलं. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे हिंदुत्ववादी शिवसेनेची ‘स्पेस’ भरुन काढण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामध्ये त्यांना किती यश मिळणार हे येत्या काळात स्पष्ट होईल. तूर्तास तरी त्यांनी फक्त पक्षाचा झेंडाच भगवा केलेला नाही तर हिंदुत्ववादी दिशेने आपली वाटचाल असल्याचंही स्पष्ट केलं आहे.

 

Story img Loader