मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या स्पष्ट आणि रोखठोक भूमिकेसाठी नेहमीच ओळखले जातात. त्यांच्या सर्व भूमिका या सडेतोड राहिल्या आहेत. मग ते कधीकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती करण्यापासून २०१९च्या निवडणुकांआधी त्यांच्या चुका दाखवत त्यांच्यावर टीका करणं असो. त्यामुळे राज ठाकरेंची एखाद्या विषयावरची भूमिका हा कायमच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. देशातील राजकीय परिस्थिती आणि राजकारण याविषयी भूमिका मांडताना नुकतंच राज ठाकरे यांनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्याविषयी मत व्यक्त केलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी आपलं मत मांडलं आहे.

देशातील राजकारणाचा स्तर खाली गेल्याचं यावेळी राज ठाकरेंनी म्हटलं. “राजकारणाचा स्तर फक्त मुंबईत, महाराष्ट्रात नाही तर देशभरात हा स्तर खाली गेलाय. आत्तापर्यंतची मंत्रिमंडळं बघितली, तरी हे लक्षात येईल. आत्तापर्यंत भारतातलं सर्वोत्कृष्ट मंत्रिमंडळ हे १९४७ ते ५२ साली केंद्रात होतं ते आहे. ते नेहरुंच्या काळातलं मंत्रिमंडळ होतं. जो त्या विषयातला तज्ज्ञ, तो त्या खात्याचा मंत्री. ते निवडूनही आले नव्हते. निवडणुका १९५२ साली झाल्या”, असं राज ठाकरे म्हणाले.

दरम्यान, यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्याचं देखील कौतुक केलं. “मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले, तेव्हा देशाचं अर्थकारण गतीने पुढे जायला लागलं. ते देशाचे पंतप्रधान झाले, तेव्हा देशाची आर्थिक प्रगती अधिक वेगाने झाली. त्यामुळे त्या त्या खात्याचा तज्ज्ञ व्यक्ती त्या खात्याचा मंत्री असावा. पण तो नुसताच हुशार असून फायदा नसून त्याचा हेतू देखील चांगला असावा”, असं राज ठाकरे म्हणाले.

लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी देशात सक्ती केली पाहिजे – राज ठाकरे

हे जर नसते, तर देशात अराजक आलं असतं…

दरम्यान, यावेळी राज ठाकरे यांनी बोलताना देशातील कवी, साहित्यिक यांच्या कार्याचा देखील उल्लेख केला. “देशातले कवी, साहित्यिक या सगळ्यांचे आभार मानावेत तेवढे कमी आहेत. हा देश त्यांच्यात गुंतून पडला. म्हणून जी वाट लागत गेली या देशाची त्याकडे दुर्लक्ष झालं. हे जर नसते, तर या देशात अराजक कधीच आलं असतं”, असं राज ठाकरे म्हणाले.

“मला वाटतं की देशानं जर महाराजांचा विचार केला असता, तर बऱ्याचशा गोष्टी सुरळीत झाल्या असत्या. सुभाषचंद्र बोस जेव्हा सिंहगडावर आले, तेव्हा त्यांच्यासोबत काही कवी-साहित्यिक होते. तेव्हा सुभाषबाबूंनी त्यांना सांगितलं की जे काही यापुढे लिहायचं असेल, ते या व्यक्तीविषयी लिहा. जितकं त्यांच्याविषयी लिहाल, तेवढं स्वातंत्र्य एक एख पाऊल जवळ येत जाईल”, असं देखील राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.