महाराष्ट्रात दुसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत चालला आहे. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला डाग लावणारं आहे. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं आणि त्याबद्दल आरडाओरडा करणं याआधी महाराष्ट्रात होतं नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं आहे अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली आहे. एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी देशात सक्ती केली पाहिजे – राज ठाकरे

“महाराष्ट्रात जाती आधीपासून होत्याच. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान होता. जातीवर आजही मतदान होतं. सध्या महाराष्ट्राच जातीबद्दल अभिमान आहेच, पण दुसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत चालला आहे. हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चेहऱ्याला डाग लावणारं आहे. दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष वाटणं आणि त्याबद्दल आरडाओरडा करणं याआधी महाराष्ट्रात होतं नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं,” असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

प्रादेशिक अस्मिता म्हणजे काय?

“मी मराठी आहे म्हणजे मी मराठी भाषा बोलणारा माणूस आहे. महाराष्ट्रातील या भागात आम्ही मराठी बोलणारे लोक तसंच या भागात तामिळ, गुजराती, बंगाली बोलणारे लोक. भाषा आणि त्यातून निर्माण होणारी संस्कृती देश निर्माण होण्याच्याही आधीपासूनच आहेत. पण माझी भाषा आणि संस्कृती दुसऱ्यांवर लादण्यासाठी दुसऱ्या भाषेला किंवा लोकांना कमजोर करणं योग्य नाही. किती वर्ष उत्तर आणि दक्षिणेत सुरु असलेला संघर्ष आपण पाहिला आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण असा भारत आजपर्यंत आपण पाहत आलो असून त्यातूनच या गोष्टी बिघडल्या आहेत,” असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

भेदभावाची कारणंच माणसं असतात

“आजपर्यंतचे देशातील पंतप्रधान पाहिले तर देवेगौडा, नरसिम्हा राव असे काहीजण सोडले तर उत्तर प्रदेशातील आहेत. बिहार, पंजाब, मध्य प्रदेशातूनही नाही आहेत. मनमोहन सिंग असले तरी ते पंजाबमधून निवडून न आल्याने पंजाबचे म्हणता येणार नाही. नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी या सर्वांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढल्या आहेत. मग दक्षिणेतील लोक आमच्याकडून का नाही असं विचारतात. भेदभावाची कारणंच माणसं असतात. पंतप्रधानांसाठी देशातील प्रत्येक राज्य समान असलं पाहिजे. हा लाडका वैगेरे करुन चालत नाही. तसंच माणसांकडून होऊ लागतं तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते. मग त्यात सगळा समतोल बिघडतो. मग आपण राज्याचे प्रश्न उभे करतो आणि ते जातीपर्यंत येतं,” असं यावेळी राज ठाकरेंनी सांगितलं.

लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी देशात सक्ती केली पाहिजे

देशाच्या विकासात लोकसंख्या एक महत्वाचा अडथळा ठरत असून ती नियंत्रणात आणण्याची गरज असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. देशाच्या लोकसंख्येचा विचार करत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाहीत. सांगूनही लोकसंख्या कमी होत नसेल तर सक्ती करण्याची गरज आहे. यासाठी जनतेला प्रोत्साहन द्यावं लागेल असं राज ठाकरे म्हणाले आहेत. केंद्रातील काही नेत्यांशी आपण याविषयी बोललो असून लोक का घाबरतात? अशी विचारणा करताना त्यावर विचार सुरु असल्याचं मला कळालं असल्याची माहिती त्यांनी दिली.

देशातील जनतेला कमी मुलं झाल्यास फायदे देणार आहात सांगत प्रोत्साहन पण द्यावं लागेल असं सांगताना राज ठाकरेंनी याकडे आपण हिंदू, मुस्लिम असं पाहू नये असंही आवाहन केलं. “दारु पिऊन गाडी चालवल्यावर सक्ती करता. जेलमध्ये टाकता किंवा दंड घेता. यामुळे दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या कमी झाली. चांगल्या गोष्टींसाठी सक्ती करावी लागते. लोकशाही काही गोष्टींसाठी मारक ठरत असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील. काही विषयांमध्ये केली नाही तर हे प्रश्न कधीच सुटणार नाही,” असंही राज ठाकरे म्हणाले.

“जोपर्यंत आपण देशाच्या लोकसंख्येवर विचार करत नाही तोपर्यंत हे प्रश्न कधीच सुटणार नाही. रहदारी सुरळीत व्हावी म्हणून पूल बांधतो आणि परत तिथे लोकसंख्या वाढून शहर उभं राहतं. मग परत रस्ते, पूल बांधतो, परत लोक येतात. हे सर्व न संपणारं आहे. शहरांच्या विकासाचा प्लॅन होतो पण टाऊन प्लॅनिग होत नाही. ७५ वर्षांमध्ये जर टाऊन प्लॅनिंगही होत नसेल तर कसं होणार?,” अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली.

लोकसंख्या वाढीसाठी राजकारणीच जबाबदार

“लोकसंख्या वाढीसाठी राजकारणीच जबाबदार आहेत. राजकीय पक्ष कोणतेही असले तरी काही गोष्टींवर एकमताने विचार कऱण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक छोट्या गावांची शहरं झाली आहेत. पण त्यांना शहरं म्हणण्यात अर्थ नाही,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.

हा व्हिजनचाही भाग आहे सांगत यावेळी राज ठाकरेंनी स्वित्झर्लंडची आठवण सांगत एक उदाहरण दिलं. “९७-९८ मध्ये मी पहिल्यांदा स्वित्झर्लंडमध्ये गेलो होतो. सुंदर रस्ते, छान घरं, प्रत्येकाकडे गाडी, रस्त्यावर भिकारी नाही असं सगळं उत्तम होतं. मला पहिला प्रश्न पडला येथील विरोधी पक्ष कशावरुन भांडत असेल. निवडणुकीत विरोधी पक्ष काय देण्याचं आश्वासन देत असेल. तसंच आपल्याकडे एखादा गावचा माणूस, मंत्री मुंबईत आला तर मुंबई, पुण्याकडे बघताना यांच्याकडे सगळं आहे म्हणत असेल. आमच्याकडे रस्ते, पाणी नाही, लोडशेडिंग आहे. त्याच्या मते यांचं सगळं बरं चाललेलं असतं,” असं राज ठाकरे म्हणाले.

रस्ते बांधणं, पूल बांधणं, हातात मोबाइल येणं याला प्रगती मानत नाही

“प्रगती आपण नक्की केली आहे. पण याचा अर्थ रस्ते बांधणं, पूल बांधणं, हातात मोबाइल येणं याला प्रगती मानत नाही. देश म्हणून विचार करताना काही वैचारिक प्रगती झाली का? देश म्हणून आपण विचार करतो का?चीनसोबत तुलना करण्यात अर्थ नाही. आपल्या देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहेत?,” असे अनेक प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केले. “आजही निवडणुकांमध्ये विषय बदललेले नाहीत. आजही चांगले रस्ते, पाणी, वीज, शिक्षण देऊ असं सांगितलं जातं. पण मग आपण नक्की प्रगती कुठून गेली?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली.

“नुकताच पूर येऊन गेला. मग आपण देशात धरणं खूप बांधली गेली असं म्हटलं. देशाची धऱणं बांधल्यानंतर त्यातून होणारा ओव्हरफ्लो यामुळे आमची शहरं का बर्बाद होत आहेत? त्याची काही सिस्टीम लावलेली नाही. हे ७५ वर्षात होत नसेल तर मग प्रगती झाली की नाही असा प्रश्न आहे,” असं राज ठाकरेंनी म्हटलं.

“देश म्हणून आपण विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक राज्याच्या डीएनएप्रमाणे निर्णय घेतला तर एकाच राज्याची प्रगती होते आणि त्यावर सगळा दबाव येतो असं होणार नाही. पण नुसतंच मतांची गणितं मांडत बसलो तर ती होणार नाही,” असं राज ठाकरेंनी सांगितलं.

शाळांचा प्रश्न कोर्टात का जातो?

“दरवर्षी दहावी-बारावीचा किंवा प्रवेशाचा प्रश्न कोर्टात का जातो? याआधी मी कधी असं पाहिलं नव्हतं. म्हणजे कोणाला तो समजत नाही की सोडवायचा नाही? दरवेळी आपण विद्यार्थ्यांचे आपण हाल करणार आहोत का?,” अशी विचारणा राज ठाकरेंनी यावेळी केली. आमच्यावेळी आर्ट, कॉमर्स, सायन्स यापुढे फारसं काही नव्हतं. आता वेगवेगळे कोर्सेस आले आहेत. पण तिथे गेल्यानंतर पुढे काय? त्या प्रकारचं नोकऱ्या देणारं शिक्षण मिळणार आहे का?,” असंही त्यांनी विचारलं.

करदात्याला ज्या गोष्टी हव्यात त्या मिळत नाहीत

“मुंबईत झोपडपट्ट्या वाढत आहेत. आधी ९० नंतर ९५, २०००, २००५, २०२० पर्यंतच्या झोपड्या अधिकृत असतील असं बोललं जात होतं. हे कुठे थांबणार? मतांसाठी राजकारणाचा खेळ होतो. पण यातून शहरं बर्बाद होतात. संपूर्ण देशातील शहरांची ही परिस्थिती आहे. करदात्याला ज्या गोष्टी हव्यात त्या मिळत नाहीत,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.

इंदिरा गांधींच्या काळात अंतर्गत पक्षांकडे लक्ष केंद्रीत झालं

“नेहरुंना तसं आव्हान देणारं कोणी नव्हतं. इंदिरा गांधींच्या काळात आव्हानं सुरु झाली. त्यामुळे जो देशाकडे फोकस हवा होता तो अंतर्गत पक्षांकडे गेला. इंदिरा गांधींनीही अनेक चांगल्या गोष्टी आणि योजना आणल्या. पण नंतर नंतर या सर्व राजकारण्यांचं लक्ष अंतर्गत राजकारणात इतकं गेलं की द्यायला हवं तितकं लक्ष देशाकडे दिलं गेलं नाही. त्यामुळे माझं राज्य, माझा मतदारसंघ असं सुरु झालं,” अशी खंत राज ठाकरेंनी व्यक्त केली. राज ठाकरेंनी यावेळी रोजगार हमी योजनेचं उदाहरण देतााना ही सर्वात चांगली योजना असल्याचं सांगितलं. राज ठाकरेंनी यावेळी राजकीय मतभेद बाजून ठेवत देशासाठी महत्वाच्या पाच सहा मुद्द्यांवर तज्ज्ञांशी सल्ला करुन काम केलं तर अर्थ आहे असं मत व्यक्त केलं.