मुंबईतील वाहतूक नियंत्रणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे आज ठिकठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. या वाहतूक कोंडीचा फटका गायक, संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांना बसला असून त्यांना त्यांच्या एका गाण्याचं रेकॉर्डिंग रद्द करावं लागलं आहे. शंकर महादेवन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.

शंकर महादेवन यांच्या एका गाण्याचं रेकॉर्डिंग असल्यामुळे सकाळी १० वाजता ते घरातून बाहेर पडले होते. मात्र वाहतूक कोंडीमध्ये अडकल्यामुळे त्यांना रेकॉर्डिंगसाठी वेळेवर पोहोचता आलं नाही. या प्रकरणी ट्विट करत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यासोबतच या मुंबईच्या या ट्रॅफिकमध्ये आपल्या कामांचं नियोजन कसं करायचं असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

“नवी मुंबईहून सकाळी १० वाजता मी रेकॉर्डिंगसाठी निघालो. दुपारचे तीन वाजले तरीदेखील कामाच्या ठिकाणी योग्य वेळेत पोहोचू शकलो नाही. अंधेरीलाच पोहोचायला जवळपास ३ वाजते. त्यामुळे आज मला हे रेकॉर्डिंग रद्द करावं लागलं. मला समजत नाहीये की, मुंबईच्या या ट्रॅफिकमध्ये आपण आपल्या कामाचं नियोजन नक्की करावं तरी कसं”, असं ट्विट शंकर महादेवन यांनी केलं आहे.

दरम्यान, कलाविश्वातील अनेक कलाकार सध्या समाजिक मुद्द्यावर व्यक्त होताना दिसत आहेत. त्यासोबतच प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावरही टीका करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी भाष्य करत आपला संताप व्यक्त केला होता.

Story img Loader