राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांनी एकत्र येत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. मात्र, या सरकारमध्ये असलेल्या काँग्रेसची नाराजी सातत्याने बाहेर पडताना दिसत आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोणावळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. मुख्यमंत्री ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा धागा पकडत भाजपाने “नानाजी काय तुमची अवस्था?”, असं म्हणत नाना पटोले यांना चिमटा काढला आहे.

काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा लोणावळ्यात मेळावा झाला. या मेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कार्यकर्त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. नाना पटोले यांनी केलेल्या टीकेनंतर भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत नाना पटोले यांना टोला लगावला आहे.

हेही वाचा- नाना पटोलेंना मुख्यमंत्री, तर राहुल गांधींना पंतप्रधान व्हावसं वाटतंय, पण…; भाजपाचा चिमटा

“नानाजी काय तुमची अवस्था? काँग्रेसमुळे जे सत्तेत आहेत, तेच प्रदेशाध्यक्षांविरोधात काम करीत आहेत. थेट प्रदेशाध्यक्षांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, अजित पवार पाळत, फोन टॅप तरी कॅाग्रेस गप्प… ना सत्तेत कॅाग्रेसला कुणी विचारत, ना काँग्रेसमध्ये तुम्हाला असं चित्र आहे हे,” अशी कोपरखळी उपाध्ये यांनी लगावली आहे.

keshav upadhye, nana patole lonavala news, bjp tweet

हेही वाचा- सोबत राहून पाठीवर सुराच खुपसायचा असेल तर…; नाना पटोलेंचं उद्धव ठाकरे, अजित पवारांवर टीकास्त्र

लोणावळ्यातील मेळाव्यात नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

“मी जे बोललो त्यात माघार घेणारच नाही. स्वबळावरच निवडणूक लढवणार. त्यामुळे आपण कामाला लागा. मी माध्यमांशी बोलताना म्हणालो की, मुख्यमंत्र्यांनी काल शिवसैनिकांना कामाला लागण्याबद्दल सांगितलं. मग मी बोललो होतो तर त्रास होत होता, ते बोलले तर ठीक आहे. आता बारामतीवाले पुण्याचे पालकमंत्री आहेत ते कुणाची कामं करतात… आपल्या लोकांची कामं करतात का? मग आपण संपर्कमंत्र्यांना लक्ष घालायला सांगतो, पण संपर्कमंत्र्यांचं ऐकायचं की नाही ते त्यांनी ठरवायचं… कारण सही त्यांची लागते. संपर्कमंत्र्यांची सही लागत नाही,” असा टोला नाना पटोले यांनी लगावला होता. “ज्या लोकांना तडजोड करायची नसेल, सोबत राहूनही पाठीत सुराच खुपसायचा असेल तर आपल्याला काही बोलायचंच नाही. तो राग आपल्याला ताकद बनवायचा आहे”, असंही नाना पटोले म्हणाले होते.