महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस सातत्याने स्वबळाचा पुनरुच्चार करत आहे. तर पक्षश्रेष्ठीकडून अद्याप ठरलं नसल्याचं सांगितलं जात आहे. असं असलं तरी काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे इतर दोन पक्षात चलबिचल होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेमकं धोरण काय, अशी चर्चाही सुरू आहे. या सगळ्या राजकीय चर्चा सुरू असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आणखी एक मोठा दावा केला आहे. २०२४ मध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात काँग्रेसचं सरकार येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. हे सांगतानाच त्यांनी या मागील कारणांचाही उलगडा केला.

यावेळी ते म्हणाले, २०२४ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार बनणार म्हणजे बनणारच. कारण, आज देशामध्ये भाजपाला पर्याय फक्त काँग्रेस आहे. भाजपाने केंद्रामध्ये बसून देश विकायला काढला आहे, देश विकला. लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे. काही लोकांना तर असं वाटतं आहे की करोना परवडला पण ही महागाई परवडत नाही. असं लोक आता बोलू लागले आहेत. भाजपाने करोना आणि महागाई या दोन्हीचा संगम करुन आता देशातल्या लोकांचं जगणं मुश्किल केलं आहे.

हेही वाचा – शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून इशारा मिळाल्यानंतरही नाना पटोले स्वबळाच्या नाऱ्यावर ठाम; म्हणाले…

भाजपाला पर्याय फक्त काँग्रेस आहे हे सांगताना नाना पटोले म्हणतात, भाजपाने देशवासियांचं जगणं मुश्किल केलं आहे. त्याचा विरोध म्हणून आणि त्यांना पर्याय म्हणून फक्त काँग्रेस आहे. काँग्रेसच आता देशाला पुढे नेऊ शकतं हा लोकांचा विश्वास आता दृढ झालेला आहे. आणि म्हणूनच राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ मध्ये केंद्रात सरकार तयार होणारच.

राज्यातल्या मंत्रिमंडळातले काँग्रेसचे दोन मंत्री बदलणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्याबद्दल विचारणा झाली असता नाना पटोले म्हणाले, अजून कोणतीही चर्चा माझ्यापर्यंत आलेली नाही. त्यामुळे हायकमांड जे निर्णय घेतील त्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू. मी हायकमांडचे आदेश मानणारा एक कार्यकर्ता आहे. त्यांनी मला जेव्हा राजीनामा देण्यास सांगितलं होतं तेव्हा मी दिला होता. ते जे ठरवतील तसं होईल.