केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना केलेल्या खळबळजनक विधानामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कानशिलात लगावण्याच्या राणेंच्या विधानानंतर भाजप आणि महाविकासआघाडीच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देखील आता यावर आपली प्रतिक्रिया देत राणेंवर सडकून टीका केली आहे. “राणेंचं ते विधान म्हणजे फक्त मुख्यमंत्र्यांचाच अपमान नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे”, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर बोलताना नवाब मलिक म्हणाले कि, “नारायण राणे मुख्यमंत्र्यांसाठी जी भाषा वापरत आहेत, मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली वाजवण्याची जी विधानं करत आहेत तो फक्त मुख्यमंत्र्यांचाच अपमान नव्हे तर महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे. हे कधीही सहन होऊ शकत नाही. लोकांना कळलं पाहिजे कि, कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. कितीही मोठा व्यक्ती असली तरी निश्चितपणे कायदेशीर कारवाई होणारच.”

भाजपला महाराष्ट्रात प. बंगालसारखं हिंसक राजकारण करायचंय!

“भाजपने ज्या पद्धतीने पश्चिम बंगालमध्ये हिंसक राजकारण सुरु केलं. तेथील वातावरण बिघडवण्याचा काम केलं तेच राजकारण आता त्यांना महाराष्ट्रात करायचं आहे. पण महाराष्ट्राची जनता हे कधीही स्वीकारणांर नाही. भाजपला देखील हे कळायला हवं कि, ही भाषा अशोभनीय आहे. अशी भाषा आणि असं राजकारण महाराष्ट्राची जनता कधीही स्वीकारणार नाही. कोणीही कितीही मोठा असो, त्यांच्यावर कारवाई होणारच”, असं म्हणत नवाब मलिक यांनी भाजपला सूचक इशारा देखील दिला आहे.

राणेंना अटक करण्याचे नाशिक पोलीस आयुक्तांचे आदेश

गुन्ह्याची गंभीरता, व्यापकता लक्षात घेता नारायण राणे यांना तात्काळ अटक करून कोर्टासमोर उपस्थित करणं आवश्यक आहे. यासाठी पोलीस उप-आयुक्त दर्जा अधिकार नेमणं उपयुक्त असल्यामुळे पोलीस उप-आयुक्त संजय बारकंडु यांना नारायण राणेंना अटक करण्यासाठी नेमण्यात आलं आहे. तसेच त्यांना पोलिसांचं एक पथक तयार करून नारायण राणेंना अटक करून कोर्टासमोर उपस्थित करण्याचे आदेश नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहेत.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनादिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे खबळजनक विधान केलं होतं. रायगडमधील महाड येथे राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले कि, “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून…अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.” या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते. दरम्यान, भर पत्रकार परिषदेत राणेंनी केलेल्या या विधानाची चर्चा राज्यभर सुरु असून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Story img Loader