राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना करोनाची लागण झाल्यानंतर आपल्यातील राजकीय मतभेद बाजूला ठेऊन पंकजा मुंडे यांनी फोन करुन लवकर बरे व्हा अशा सदिच्छा दिल्या होत्या. याबद्दल बोलताना धनंजय मुंडे यांनी ज्याच्याशी इतकं वर्ष बोलणं नाही त्याने फोन करुन प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणं यामुळे नक्कीच फरक पडतो असं सांगत त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या याचा उलगडा केला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

पंकजा मुंडे यांनी फोन केल्यासंबंधी बोलताना धनंजय मुंडे यांनी सांगितलं की, “२०११-१२ पासून आमच्या कुटुंबात फारसा संवाद नव्हता. एखादी दु:खाची घटना असेल तर आम्ही एकत्र आलो आहोत. मला करोना झाल्याचं कळाल्यानंतर त्यांनी मला फोन केला. चार-पाच वेळा त्यांनी माझी चौकशी केली. मी बरा व्हावा यासाठी सदिच्छाही व्यक्त केल्या. कुटुंबात दोन राजकीय विचारधारा याआधी आल्या आहेत. पण कुटुंब वेगळं ठेवलं पाहिजे अशी माझी नेहमी इच्छा राहिली आहे. त्या इच्छेला अनुसरुन माझ्या आजारपणाच्या काळात बहिणीने फोन केला, सदिच्छा व्यक्त केली, याचा आनंद वाटला. ज्याच्याशी इतकं वर्ष बोलणं नाही त्याने फोन करुन प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणं यामुळे नक्कीच फरक पडतो”.

आणखी वाचा- “…तो अति आत्मविश्वास नडला”, करोनावर मात केल्यानंतर धनंजय मुंडेंनी व्यक्त केल्या भावना

“लॉकडाउनमध्ये काम करत असताना दोन महिने मी जिल्ह्याबाहेर पडलो नव्हतो. मुंबईतील परिस्थिती किती गंभीर आहे याची बीडमध्ये राहून जाणीव होती. मुंबईत गेलो तरी आपल्याला काही होणार नाही हा अति आत्मविश्वास मला नडला,” असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- करोनाचा मानसिक हल्ला होऊ देऊ नका; धनंजय मुंडेंचा मोलाचा सल्ला

धनंजय मुंडे सध्या बीडमधील आपल्या घरी क्वारंटाइन आहेत. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आपली प्रकृती सध्या चांगली असून आई-वडिलांच्या पुण्याईने मिळालेलं हे नवीन जीवन जनतेच्या सेवेत घालवणार आहे अशा भावना यावेळी व्यक्त केल्या. “करोनाची लागण झाल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आईचा चेहरा दिसला. काही झालं तरी घऱात एकुलता एक मुलगा असल्याने आणि तिने खूप कष्ट घेऊन मोठं केलं आहे. पण तिच्यामुळेच आपल्याला लढायचं बळ मिळालं,” असंही धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान धनंजय मुंडे यांनी यावेळी मानसिकदृष्ट्या खचू नका, गरज असेल तरच बाहेर पडा, स्वच्छता ठेवा असं आवाहन लोकांना केलं आहे.