शरद पवार यांच्या वयाच्या 80 व्या वर्षी सुद्धा देशातील सत्ताधारी पक्ष धसका घेत आहेत. अशा नेत्यांचे आपण सर्व कार्यकर्ते आहोत. एखाद्या 25 वर्षाच्या नेत्याची ज्या पद्धतीने भीती केंद्रातील सत्ताधाऱ्यांना आहे, तीच भीती या क्षणाला सत्ताधारी पक्षाला शरद पवार यांची आहे असे सामाजिक न्यायमंत्री धंनजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जलसंपदामंत्री जयंत पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

“सध्याची लोकशाही फार बदललेली आहे. आजच्या लोकशाहीमध्ये 64 आमदारांचा मुख्यमंत्री होतो, 54 आमदारांचा उपमुख्यमंत्री होतो, 44 आमदारांचा मंत्री होतो आणि 105 आमदार असणारा विरोधी पक्षात बसतो. या लोकशाहीचं उभ्या देशाला दर्शन घडवण्याचं काम शरद पवार यांनी केलं आहे. होत्याच नव्हतं, नव्हत्याच होतं ही म्हण ऐकत होतो. पण, विधानसभेच्या निवडणुकित ज्याचं होत त्याचं नव्हतं कसं झालं आणि ज्याचं नव्हतं त्याचं होतं कसं झालं हे शरद पवार यांनी दाखवून दिलं आहे,” असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं.

पुढे ते म्हणाले की, “दिल्लीतसुद्धा श्रवणयंत्र देण्याची गरज आहे असे गणेशजी म्हणाले. ज्या वेळेस यंत्र देऊनसुद्धा श्रवण काम करत नसेल, तेव्हा श्रवणाखाली देण्याची तरतूद असली पाहिजे. जिथं मशीन काम करू शकत नाही तिथं हाताने काम करता आलं पाहिजे”.

आणखी वाचा- आजोबांसाठी नातू मैदानात ! पवारांच्या पत्रावरुन टीका करणाऱ्या भाजपाला सडेतोड प्रत्युत्तर

“उत्तर भारतात सर्व शेतकरी केंद्र सरकारच्या शेती धोरणाचा विरोधात कडाक्याच्या थंडीत आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांचं रक्त सांडलं जात आहे. शेतकऱ्यांच्या प्रामाणिक आंदोलनाला सुद्धा बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे यासारखी दुसरी लाजिरवाणी गोष्ट कुठली नाही,” अशी टीका त्यांनी भाजपावर केली आहे.

आणखी वाचा- माझं आणि फडणवीसांच भांडण, पण…; महादेव जानकर यांचा राजकीय गौप्यस्फोट

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वयंपाकघरात शिजणारं अन्नसुद्धा शेतकऱ्याने मेहनतीने, घाम गाळून, रक्त सांडून पिकवलं आहे. आपल्याकडे म्हण आहे, खाल्लेल्या अन्नाला तरी जागा. त्याची जाणीव जर होत नसेल, तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक्ष कोणी शेती करणारा नसेल. पण, या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीमागे खंबीरपणे राहिलं पाहिले. शेतकरी जिवंत राहील तर तुम्ही आम्ही जिवंत राहू,” अस मुंडे म्हणाले.

आणखी वाचा- शरद पवारांच्या नावाने ठाकरे सरकार लागू करणार योजना; मंत्रिमंडळ बैठकीत घेणार निर्णय

डॉ. अमोल कोल्हे कोल्हे यांनी आयुष्यात फेटा बांधणार नाही असं म्हटलं होतं-
“विधासभेच्या वेळी डॉ. अमोल कोल्हे हे परळी येथे माझ्या प्रचारसभेसाठी आले होते. तेव्हा, त्यांनी प्रण केला होता की, धनंजय मुंडे निवडून आले तरच आयुष्यात फेटा घालेन, अन्यथा फेटा बांधणार नाही. मी, निवडून आलो. माझं भाग्य बघा, कोल्हे साहेबांचा छत्रपती शंभूराजे हा कार्यक्रम सुरू होता आणि मला फेटा बांधायची वेळ आली. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती शंभूराजे यांच्या वेशभूषेत होते. त्यावेळी म्हणालो होतो. एखाद्या मावळ्याला छत्रपती संभाजीराजे यांचा सत्कार करण्याची संधी मिळाल्यानंतर जो आनंद होत असेल तोच आनंद आज २१ व्या शतकात छत्रपतींच्या वेशभूषेत असलेल्या माझ्या जिवलग मित्राचा सत्कार करताना मावळा म्हणून मला झाला,” अशी भावना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली.