मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अशोभनीय आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. राणे यांना महाड प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री जामीन मंजूर केला. मात्र, दिवसभर राणे यांच्या विधानाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी १५ ऑगस्ट रोजी दिलेल्या भाषणामध्ये कितवा स्वातंत्र्यदिन आहे यासंदर्भात त्यांच्या सचिवांकडे विचारणा केल्याच्या मुद्द्यावरुन राणेंनी केलेल्या टीकेमध्ये कानाखाली मारली असती असा उल्लेख केल्याने प्रकरण तापलं. मात्र मुख्यमंत्र्यांप्रमाणेच कितवा स्वातंत्र्यदिन हा गोंधळ केंद्रीय मंत्री असणाऱ्या नितीन गडकरी यांचा पण झाल्याचं त्यांनीच ट्विट केलेल्या एका कार्यक्रमामधील व्हिडीओत दिसत आहे.

२० ऑगस्ट रोजी नागपूरमधील झिरोमाईल स्थानक परिसरात उभारलेले फ्रिडम पार्कचं उद्घाटन करण्यात आलं. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते झिरोमाईल फ्रिडम पार्क, कस्तुरचंद पार्क स्थानकाचे  उद्घाटन झाले. झिरोमाईल स्थानक परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांच्यासह भाजपचे व काँग्रेसचे आमदार उपस्थित होते.

नक्की वाचा >> ‘राणे म्हणजे भोकं पडलेला फुगा, कितीही हवा भरली तरी…’; ‘सामना’मधून हल्लाबोल

या कार्यक्रमादरम्यान नितीन गडकरी यांनी दिलेल्या भाषणामध्ये पार्क नागपूरच्या वैभवात भर टाकणारे आहे. या स्थानकाची इमारत वीस मजली असेल. अशाप्रकारचे देशातील हे पहिले स्थानक असेल अशी माहिती दिली. मात्र या प्रकल्पाबद्दल बोलताना नितीन गडकरी यांनी यंदा भारताच्या स्वातंत्र्याचे सुवर्णमोहोत्सवी वर्ष असल्याचा उल्लेख केला होता. “७५ व्या वर्षामध्ये आपल्या देशाने प्रवेश केलाय. आपल्या या सुवर्णमोहोत्सवानिमित्त जागोजागी अशा गोष्टी उभारल्या पाहिजेत जे जगभरामध्ये लक्षात ठेवलं जाईल, अशी इच्छा पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलेली,” असं गडकरी भाषणात म्हणाले. विशेष म्हणजे हा चुकीचा उल्लेख असणारा व्हिडीओ गडकरींच्या ट्विटर हॅण्डलवरुनही ट्विट करण्यात आलाय.

नक्की वाचा >> राणेंच्या अटक आणि सुटका नाट्यावर नितेश राणेंची फिल्मी प्रतिक्रिया; रात्री ट्विट केला ‘हा’ व्हिडीओ

भारताच्या स्वातंत्र्याचे यंदाचे कितवे वर्ष आहे यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचाही गोंधळ झाल्याचं १५ ऑगस्ट रोजी पहायला मिळालं होतं. उद्धव ठाकरेंनी सचिवांकडे विचारणा करुन आपली चूक सुधारली होती. मात्र याच विषयावरुन सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असणाऱ्या नारायण राणेंनी टीका केली होती. सोमवारी रायगडमधील महाड येथे नारायण राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी “त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती,” असं म्हटलं होतं. या पत्रकार परिषदेत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर देखील उपस्थित होते.

रौप्य, सुवर्ण आणि हीरक महोत्सव म्हणजे काय?

एखाद्या गोष्टीला, घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्यास त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. तर ५० व्या वर्षी होणाऱ्या कार्यक्रमाला सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम असं म्हणतात. त्याचप्रमाणे ६० व्या वर्षी हीरक महोत्सव तर ७५ व्या वर्षी अमृत महोत्सव असतो. तसेच एकाद्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्यास त्याला शताब्दी वर्ष असं म्हणतात.