शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार आले. तत्पूर्वी साधारण महिनाभर भाजपा विरुद्ध शिवसेना व आघाडीत सत्तासंघर्ष सुरू होता. एवढेच नाहीतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या समर्थनाने भाजपाने सरकार स्थापन केल्यानंतर हा संघर्ष सर्वोच्च न्यायलायात देखील पोहचला होता. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत केलेल्या घरवापसीमुळे देवेंद्र फडणवीस यांना देखील मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर गुरूवारी महाविकास आघाडीच्यावतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रपदाची शपथ घेतली. भाजपाची साथ सोडत व एनडीएमधून बाहेर पडत काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाऊन सरकार स्थापन केलेल्या शिवसेनेवर केंद्रीय मंत्री भाजापाचे नेते गिरराज सिंह यांनी घणाघात केला आहे. आता शिवसैनिकाला प्रभू रामाचे नाव घेण्यासाठी सोनिया गांधी यांचे निवासस्थान असलेल्या १० जनपथवर नाक रगडावे लागेल, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे.
”शिवसेनेने बाळासाहेबांच्या आत्म्यास सोनिया गांधी यांच्या हस्ते गहाण ठेवले आहे. आता शिवसैनिकाला प्रभू राम आणि अयोध्येचे नाव घेण्यासाठी देखील १० जनपथवर नाक रगडावे लागेल.शिवसेनेला पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, कशाप्रकारे मुघलांनी भारतात आपले पाय पसरले असतील?” असे गिरिराज सिंह यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
शिवसेना ने बाला साहब की आत्मा को सोनिया गांधी के हाथों गिरवी रख दिया..अब शिवसैनिक को प्रभु राम और अयोध्या का नाम लेने के लिए भी 10 जनपथ पर नाक रगड़नी पड़ेगी।
शिवसेना को देखकर अंदाजा लगाया जा सकता है कि कैसे मुगलों ने हिन्दुस्तान में अपना पांव पसारा होगा?
— Shandilya Giriraj Singh (@girirajsinghbjp) November 28, 2019
दुसरीकडे राज्याती देखील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली आहे. कालच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यावर चर्चा करण्याऐवजी लपुन-छपून बहुमत कसे सिद्ध करता येईल, यावर चर्चा करण्यात नव्या सरकारने धन्यता मानली, मग बहुमताचे दावे कशासाठी? असा सवाल करत महाविकासआघाडी सरकारवर त्यांनी आरोप केला आहे. तसेच, ”भाजपने विरोधी पक्षात बसण्याची घोषणा केली असताना आणि महाविकास आघाडीने निरनिराळ्या प्रकारे बहुमताचे प्रदर्शन आणि दावे केले असताना ही लपवा-छपवी आणि भीती का? महाराष्ट्राला याचे उत्तर हवे आहे!” असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.