अहमदनगरमध्ये उपमहापौर आणि भाजप नेते श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने शहरात तणावाचे वातावरण आहे. छिंदम यांनी फोनवरील संभाषणादरम्यान केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्याची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, भाजपाने छिंदम यांना पक्षातून बडतर्फ केले असून उपमहापौर पदावरूनही त्यांची हाकालपट्टी करण्यात आली आहे.

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांच्याशी छिंदम यांचे बोलणे सुरु आहे. एका सरकारी कामसाठी त्यांनी बिडवे यांना फोन केला होता. यावेळी बोलताना उपमहापौरांनी शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप अशोक बिडवे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी कामगार युनियनकडे तक्रारही दाखल केली आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिपही त्यांनी पुराव्यासाठी सादर केली. मात्र, अल्पावधीतच ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात तणाव निर्माण झाला.

राष्ट्रावादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली शहरात मोर्चा काढण्यात आला, त्याचबरोबर शिवसेनेनेही छिंदम यांचा पुतळा जाळून निषेध केला. शिवसेनेच्या या कृतीमुळे शिवसेना आणि भाजपमधला अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. त्याचबरोबर काही तरुणांच्या गटाने छिंदम यांच्या शहरातील कार्यालयावर दगडफेक केली तसेच त्यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली.

दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते आणि नगरचे खासदार दिलीप गांधी म्हणाले, “शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या अक्षेपार्ह वक्तव्याचा मी निषेध करतो. छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.”

Story img Loader