पालघर शिक्षण विभागाच्या ऑनलाइन शैक्षणिक उपक्रमाचा केविलवाणा प्रयत्न

निखिल मेस्त्री, पालघर

पालघर : शासनाच्या सूचनांप्रमाणे पालघर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा शैक्षणिक उपक्रम सुरू केला आहे.  उपक्रम स्तुत्य असला तरी अनेक विद्यार्थ्यांकडे त्यासाठी लागणाऱ्या सुविधाच उपलब्ध नसल्याने हा उपक्रम कसा यशस्वी होऊ शकेल असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी  विद्यार्थ्यांंना शैक्षणिक उपक्रमाचे धडे ऑनलाइन पद्धतीने देण्यात यावेत असे शासनाच्या सूचना आहेत.  त्यादृष्टीने जिल्हा परिषदेमार्फत ऑनलाइन शैक्षणिक उपक्रमाला सुरूवात झाली आहे. विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रम तसेच अभ्यासाच्या विविध पद्धती समजाव्यात यासाठी हे प्रभावी माध्यम शिक्षकांमार्फत राबविले जात आहेत. यामध्ये शिक्षक-विद्यार्थी थेट संवाद,अभ्यासक्रमसंबंधी प्रश्नावली आदी शिक्षण ऑनलाइन दिले जात आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे अद्ययावत भ्रमणध्वनी व तत्सम सुविधा उपलब्ध आहेत, असे विद्यार्थीच या शिक्षण पद्धतीचा लाभ घेऊ  शकतात. परंतु ज्या  विद्यार्थ्यांकडे तशा सुविधा उपलब्ध नाहीत त्यांना याचा लाभ घेता येणार नाही. अशी परिस्थिती जिल्ह्य़ात आहे. परिणामी अशा हजारो विद्यार्थ्यांंना सुविधेअभावी या उपक्रमास मुकावे लागण्याची वेळ येणार आहे.

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन हजार  प्राथमिक तर ६८० माध्यमिक शाळा आहेत. जिल्हा परिषदेने राबविलेल्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा उपक्रम हा स्तुत्य असला तरी तो यशस्वी होईल अशी शंका आहे.

ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून पुढील वर्षांच्या अभ्यासक्रमाचे धडे दररोज एक तास देण्यावर भर दिले जात आहेत. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे त्यासाठी लागणाऱ्या  सुविधा उपलब्ध नाहीत अशा विद्यार्थ्यांना त्या सुविधा प्राप्त करून देण्यासाठी जिल्हा परिषदेकडे कोणतेही धोरण नाही. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पुढाकार घेऊन अशा ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी सुविधा नसलेल्या  विद्यार्थ्यांना  सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी  पुढे येत आहे.

सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेकडे कोणतेही धोरण नसले तरी विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या विचार आणि अभ्यासक्रम याच्या दृष्टिकोनातून चर्चा केली जाईल. याबाबत अशा सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांचा आढावा घेणे तसेच त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे सुरू आहेत.

-भारती कामडी, अध्यक्षा, जिल्हा परिषद

विविध माध्यमातून हे शिक्षण उपलब्ध कसे करून देता येईल यासाठी प्रयत्नशील राहू. जेथे शक्य आहे व करोना प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती व पालक संवाद घडवून तेथे शाळा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे.

-नीलेश सांबरे, उपाध्यक्ष तथा शिक्षण सभापती, जि. प.पालघर

Story img Loader