हा पुरस्कार माझा नसून, नानासाहेब धर्माधिकारी यांनी गेली ६५ वर्षे केलेल्या कार्याचा आहे. त्यांनी कष्ट केले. समाजसेवेचा पाया मजबूत केला. त्यांचे कार्य पुढे नेण्याचे काम मी केले आहे. राज्य आणि केंद्र सरकारने या कामाची दखल घेतली याचा आनंद आहे. ‘पद्मश्री’ सन्मानाने अधिक जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळेल, अशी प्रतिक्रिया ‘पद्मश्री’ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यावर बोलताना आप्पासाहेबांनी हा पुरस्कार माझा नसून नानासाहेब धर्माधिकारी यांनी ६५ वर्षे केलेल्या कार्याचा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने श्री सांप्रदायात चैतन्याचे वातावरण आहे. अलिबागमधील रेवदंड्यासह संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी श्री सदस्यांनी फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंद साजरा केला.
निरुपणाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचा वारसा आप्पासाहेबांना नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून लाभला. व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन यांसारख्या विविध क्षेत्रांत त्यांनी मोठे काम केले. त्यांच्या याच कामाची दखल घेऊन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी त्यांची राज्याचे स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली होती. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमांचे आयोजन केले होते. पर्यावरण संवर्धनासाठी त्यांनी मोठी मोहीम राबवली आहे. श्री सदस्य राज्यात ठिकठिकाणी वृक्षलागवड करत आहेत. या मोहीमेच्या माध्यमातून अनेक परिसर हिरवाईने नटलेले आहेत. कोट्यवधी रोपांची लागवड करून त्यांचे जतन करण्याचे काम श्री सदस्य करत आहेत.