पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाकडून झालेल्या हत्याकांडातील आरोपींचा शोध ड्रोनच्या मदतीने घेण्यात येणार असून 300 पेक्षा अधिक आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक गावामध्ये दाखल झाले आहे.  गावामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाल्याने गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.

जिल्ह्यातील गडचिंचले गावात जमावाकडून 16 एप्रिलच्या रात्री दोन महंत व त्यांच्या चालकाची निर्घुण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण विभागाकडे देण्यात आला असून त्यांचे पथक गडचिंचले भागात दाखल झाले आहे. या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी वेगवेगळ्या विभागांची मदत घेतली जात असून ठाणे ग्रामीण पोलीस विभागाच्या फॉरेन्सिक पथकाने गावातील घटनास्थळाची पाहणी करून नमुने घेतले आहेत.

आणखी वाचा- पालघर घटनेत एकही मुस्लीम नव्हता – अनिल देशमुख

या हत्याकांडातील तब्बल तीनशेहून अधिक आरोपी सध्या लगतच्या जंगलात लपून बसले असून या गावाच्या चारीही बाजुंनी घनदाट जंगल असल्याने आरोपींचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हानात्मक ठरत आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस ड्रोनची मदत घेत असून पोलिसांचा मोठा फौजफाटा गडचिंचले भागात दाखल झाला आहे.