राज्यात करोनाचं संकट वाढत असल्याने निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांनी तर कडक लॉकडाउन लावला आहे. मात्र अद्यापही नियमांचं उल्लंघन होत असल्याने पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. दरम्यान काही ठिकाणी कारवाई करणाऱ्या पोलिसांवरच हल्ले होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. नुकतंच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये गर्दी जमा केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या पोलिसांना मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
संगमनेर शहरात लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी यावेळी गर्दी करण्यास मनाई केली असता जमावाने पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केला. जमावाकडून पोलिसांना मारहाण केली जात असल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये जमाव पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहे. इतकंच नाही तर पोलीस कर्मचारी जीव वाचवून धावत असताना त्याचा पाठलाग करताना दिसत आहेत.
संगमनेरमध्ये गर्दी केल्याचा जाब विचारल्याने जमावाकडून पोलिसाला मारहाणhttps://t.co/zTacDrMfeP < येथे वाचा सविस्तर बातमी #Maharashtra #Ahmednagar #Sangamner #MaharashtraPolice #CoronaVirus #Lockdown pic.twitter.com/PEtpkklqXM
— LoksattaLive (@LoksattaLive) May 7, 2021
झालं असं की, दिल्ली नाका परिसरात गुरुवारी सायंकाळी काही लोकांनी गर्दी केली होती. संचारबंदी असल्याने गस्त घालणाऱ्या पोलिसांनी यावेळी गर्दी केल्याबद्दल जाब विचारल्याने संतप्त जमावाने त्यांच्यावर थेट हल्ला करण्यास सुरुवात केली. यावेळी पोलीस चौकीसह पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली.
हल्ल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. यावेळी जमावाला तेथून हटवण्यात आलं. पोलिसांनी याप्रकरणी सहा अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.