प्रबोधनावर भर; कारवाई न करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश

आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा विसावा, तळ आणि मुक्कामांच्या ठिकाणी प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारवाई करण्यापेक्षा वारकऱ्यांमध्ये प्लास्टिक न वापरण्याबाबत प्रबोधन करण्यावर भर दिला जाणार असून प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी वारीच्या तोंडावरच आल्याने यंदा कारवाई न करण्याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती-व्यवस्थापन विभागाने वारीनिमित्त ‘आषाढी वारी २०१८’ हे मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. याद्वारे विठ्ठल आणि रुक्मिणी यांचे लाइव्ह दर्शन मिळणार आहे.

राज्य शासनाने २३ मार्च रोजी सरसकट प्लास्टिकबंदीची अधिसूचना काढली. त्यानंतर पुढील तीन महिने उपलब्ध प्लास्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी देण्यात आले होते. ही मुदत संपल्यानंतर २३ जूनपासून प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आणि २७ जून रोजी अन्नधान्य आणि इतर पदार्थ प्लास्टिक पिशवीतून देण्यास परवानगी दिल्याची घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली. दरम्यान, आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या विसावा, मुक्कामाच्या ठिकाणी प्लास्टिकबंदीबाबत कारवाई करण्याचे कोणत्याही प्रकारचे आदेश स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आलेले नाहीत. वारीमध्ये जेवणासाठी पत्रावळींचा वापर करण्याचे निर्देश मुक्कामाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या समन्वय कक्षाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच प्रशासनाकडून प्लास्टिक न वापरण्याबाबत वारकऱ्यांमध्ये प्रबोधन करण्यात येणार आहे.

प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी वारीच्या तोंडावरच आल्याने यंदा वारीमध्ये कारवाई करण्यापेक्षा प्रबोधनावर भर दिला जाणार असल्याचे उपजिल्हाधिकारी आणि पालखी सोहळा समन्वय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी सांगितले.

वारीसाठी विशेष अ‍ॅप

  • वारीनिमित्त आषाढी वारी २०१८ हे अ‍ॅप जिल्हा प्रशासनाकडून तयार करण्यात आले आहे. त्यात वारीमार्गात पालख्या कोठे आहेत याची माहिती मिळेल.
  • तसेच हरवलेल्या व्यक्तींबाबतची माहितीही त्यावर मिळणार असून वारीच्या काळात वारकऱ्यांना योग्यवेळी मदत मिळण्याबरोबरच अन्य माहितीही या अ‍ॅपद्वारे देण्यात येणार आहे.
  • आपत्कालीन परिस्थितीमध्ये भाविकांना महत्त्वाचे संदेश, पालखी मार्गावरील वाहतुकीची व्यवस्था आणि पंढरपूर येथून विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्याचे थेट प्रक्षेपण या अ‍ॅपद्वारे केले जाणार आहे.
  • अ‍ॅपमध्ये पालखी मार्गातील विसाव्याची ठिकाणे, पाणी पुरवठय़ाचे ठिकाण, समन्वय कक्ष, गॅस आणि केरोसिन मिळण्याचे ठिकाण, टँकरची सुविधा, शौचालय आदी ठिकाणांचे जीपीएस लोकेशन देण्यात आले आहे.
  • वारीमध्ये संपर्कासाठी मोबाइलचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो. त्यामुळे पालखी मार्गस्थ होत असलेल्या भागातील भ्रमणध्वनी जंक्शन क्षमता वाढविण्यासाठी आणि मोबाइल टॉवर उभारण्याबाबत मोबाइल कंपन्यांना निर्देश दिले आहेत, असेही उदयसिंह भोसले यांनी सांगितले.

प्रत्येक पालखी मुक्कामी कक्ष

पालखी मार्गावरील प्रत्येक पालखी मुक्कामाच्या ठिकाणी समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. स्थानिक प्रांत अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांचा यात समावेश करण्यात आला आहे. हे समन्वय कक्ष चोवीस तास सुरू राहणार असून कक्षासाठी पोलीस निरीक्षक दर्जाच्या स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. पालखीत सहभागी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी समन्वय कक्षात महसूल, आरोग्य, पाणीपुरवठा, पोलीस, स्वच्छता, परिवहन, महावितरण अशा विविध विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालखी सोहळा स्वच्छ व निर्मल होण्यासाठी निर्मल अभियान राबविण्यात येणार असून त्यासाठी पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्य़ांमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले होते.

 

Story img Loader