कांद्याला कवडीमोल भाव आल्याने त्याच्या विक्रीतून आलेली रक्कम सरकारचा निषेध करत पंतप्रधान कार्यालयाला पाठवलेली मनीऑर्डर परत आली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नैताळे येथील पोस्ट कार्यालयात कांदा उत्पादक शेतकरी संजय साठे यांनी ही मनीऑर्डर पाठवली होती. पोस्ट कार्यालयाने संजय साठे यांना बोलावून त्यांच्याकडे १०६४ रुपयांची रक्कम सुपूर्द केली आहे.
लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात लिलावासाठी आणलेल्या कांद्याला अत्यंत कवडीमोल भाव मिळाला होता. त्यामुळे नैताळे संजय साठे यांनी विक्रीतून आलेली १०६४ रुपयांची रक्कम मनीऑर्डरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून कांदा उत्पादकांच्या व्यथा समोर आणली होती.
दरम्यान, संजय साठे राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का, याबाबत चौकशी सुरू झाली होती. अधिकाऱ्यांनी परिसरात आणि मित्रपरिवाराकडे याबाबत चौकशी केली होती. यावरून नाराज झालेले शेतकरी मनीऑर्डर कुठल्याही आश्वासनाशिवाय परत आल्याने संतप्त झाले आहेत.