राज्यात सध्या पूजा चव्हाणच्या कथित आत्महत्येवरुन चर्चा सुरु असून अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहे. भाजपाकडून वनमंत्री संजय राठोड यांचं जाहीरपणे नाव घेतलं जात असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत कारवाई न करण्याच्या भूमिकेत आहे. या सर्व घडामोडींदरम्यान पूजा चव्हाणच्या वडिलांनी एबीपी माझाला मुलाखत देताना अनेक खुलासे केले आहेत.

कर्ज वाढलं होतं-
“पूजावर खूप ताण होता. तिच्या डोक्यावरील कर्ज वाढलं होतं. पोल्ट्री फार्मसाठी तिने कर्ज घेतलं होतं, यामध्ये तिचं खूप मोठं नुकसान झालं होतं. यामध्ये काही होणार नाही म्हणून आपण पुण्याला जाऊन दुसरं काही तरी करते असं ती म्हणाली होती,” अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे.

पूजा चव्हाण तीन वर्ष भाजपा कार्यकर्ता होती; वडिलांचा गौप्यस्फोट

“आत्महत्या केली त्यादिवशी दुपारी २ वाजता माझं तिच्याशी बोलणं झालं होतं. पैसे वैगेरे हवं का असं विचारलं होतं, त्यावर ती नको म्हणाली होती,” असंही त्यांनी सांगितलं आहे.

कोणाचाही मृत्यूशी संबंध नाही –
पूजा प्रकरणात अनेक नावं येत असून त्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “हे सगळं चुकीचं आहे. कोणी कोणाचं नाव जोडून काहीतरी सांगत आहे. हे सगळं थांबलं पाहिजे. पोलिसांचा तपास सुरु असताना विनाकारण आरोप कशासाठी करत आहात? माझी मुलगी गेली आहे त्यात हे ऐकून वाईट वाटतं. बदनामी थांबवा असं आवाहन केल्यानंतरही बदनामी सुरु आहे हे थांबलं पाहिजे”. पूजा प्रकरणाशी अरुण राठोड नाव जोडणंही चुकीचं असून, त्याचा काहीच संबंध नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

पूजा चव्हाण प्रकरण: अजित पवारांनी मांडली संजय राठोड यांची बाजू; म्हणाले…

दरम्यान मंत्र्यांचं नाव जोडलं जात असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सांगितलं की, “मंत्री असो किंवा कोणीही असो तपासाअंती नाव आलं तर कारवाई होईलच. पण सध्या कोणाचं नाव घेऊ शकत नाही”.

भाजपासाठी तीन वर्ष काम केलं –
पुढे त्यांनी सांगितलं की, “पूजाने तीन वर्ष भाजपासाठी काम केलं. तिथं कोणी काही विचारत नव्हतं. काय झालं नेमकं मला माहिती नाही”. “नुसती बदनामी सुरु आहे, पण साधा मला कोणी फोनही केला नाही. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना सर्वांसोबत तिचे फोटो आहेत. पण कोणीही चौकशीसाठी फोन केला नाही. फक्त बदनामी सुरु आहे. सर्वांना सत्य समोर आल्यावर बोललं पाहिजे,” अशी विनंती त्यांनी केली आहे.