पुण्यात आत्महत्या केलेल्या पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणामुळे राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव चर्चेत आहे. या प्रकरणावर १५ दिवस मौन धरल्यानंतर राठोड यांनी काल (२३ फेब्रवारी) पोहरादेवीत शक्ती प्रदर्शन करत बदनामी केली जात असल्याचा दावा केला. मात्र, राज्यात करोनाचं संकट गडद होत असताना राठोड यांनी केलेल्या गर्दीवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याच मुद्द्यावरून भाजपाकडून शिवसेनेला कोडींत पकडण्याचा प्रयत्न होत आहेत. “करोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही,” असा टोला लगावत भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

राजकीय वर्तुळात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचे पडसाद उमटत असताना संजय राठोड यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनावरून राजकारण पेटलं आहे. पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर राज्याचे वनमंत्री संजय राठोड सार्वजनिक जीवनापासून अलिप्त झाले होते. अखेर २३ फेब्रवारी रोजी ते सर्वांसमोर आले. त्यानंतर त्यांनी पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करत दर्शन घेतलं होतं. संजय राठोड यांनी गर्दी जमवल्याचा आरोप होत असून, त्यावरून आता भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे.

आणखी वाचा- “कोण आला रे कोण आला…बंजाऱ्यांचा वाघ आला,” तुफान गर्दीत संजय राठोड यांच्या समर्थकांची घोषणाबाजी

“करोना काळात गर्दी केली म्हणून १० हजार जणांवर गुन्हे दाखल करु, पण गर्दी जमवणाऱ्या एका “गबरुवर” कारवाई नाही. एका भगिनीचा जीव गेला, महाराष्ट्र हळहळला पण मुख्यमंत्री बोलणार नाहीत. महाविकास आघाडी सरकारचे महाराष्ट्रात सुरु आहे… तो मी नव्हेच,” अशी टीका शेलार यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.

आणखी वाचा- “माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार”; पूजा चव्हाण प्रकरणी संजय राठोड यांनी अखेर मौन सोडलं

राठोड मुंबईत दाखल

काल पोहरादेवी येथे दर्शन घेतल्यानंतर आपण उद्याापासून कामाला सुरूवात करणार असल्याचं संजय राठोड यांनी म्हटलं होतं. ठरल्याप्रमाणे राठोड आज मुंबईत दाखल झाले आहेत. विरोधकांकडून राठोड यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली जात आहे. पण, कालच त्यांनी अप्रत्यक्षरित्या राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.