कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर संचार बंदीच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडता येईना.तसेच आवश्यक कामासाठी निघाल्यास सोशल डिस्टसिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.अशा परिस्थितीत बँक खात्यात जमा असलेले पैसे घरपोच देण्याचे काम इंडिया पोस्ट बँक मार्फत केल्या जात आहे. या घरपोच सेवेसाठी चंद्रपूर डाक विभागाचे कौतुक होत आहे.

काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचे अनुदान व महिलांच्या नावे असलेल्या खात्यांमध्ये काही योजनांची (जनधन योजना, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, किसान सन्मान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, इतर पेंशन योजना) रक्कम जमा करण्यात आलेली आहे.त्यामुळे ही रक्कम मिळविण्यासाठी मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे. त्यावर मात करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक हा पर्याय निवडण्यात आला आहे. ग्राहकांना मूळ बँके बरोबर इंडिया पोस्ट पेमेंट बँककडून रक्कम मिळविण्याची सुविधा देण्यात येत आहे. विशेष म्हणजे पोस्ट विभागाचे कर्मचारी घरपोच सुविधा देत आहे.ग्रामीण भागात एटीएमची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बँक शाखेमध्ये जाणे ग्राहकांना बंधनकारक असते. सध्या मात्र संचारबंदीमुळे घराबाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीत इंडिया पोस्ट पेमेंट बँक ग्राहकांच्या मदतीला धावून येत आहे.

आणखी वाचा- करोनाच्या संकटात ‘डीएनआर’ वाहतूक कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी

चंद्रपूर विभागातील चंद्रपूर व गडचिरोलीमध्ये ही सुविधा शहरी भागातील 54 व ग्रामीण भागातील 604 पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी त्यांचा आधार क्रमांक आणि रजिस्टर मोबाईल नंबर नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करुन दिल्यास त्यांना खात्यावरील पैसे काढणे सोयीचे होणार आहे. या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन चंद्रपूर डाक विभागातर्फे करण्यात येत आहे. हे सर्व करीत असताना सोशल डिस्टसिंगचे तसेच सॅनिटायझेशन करण्याची खबरदारी घेतली जात आहे.