मागील तीन महिन्यापासून सातत्याने गॅसच्या किंमतीत घट होत होती. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किंमतीमध्ये वाढ झाल्यामुळे भारतातही किंमती वाढवण्यात आल्या आहेत. एक जूनपासून विनाअनुदानित गॅसच्या दरात वाढ आमंलात करण्यात आली आहे. १४ किलोच्या विनाअनुदानित गॅसच्या किंमतीत राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये ११ रुपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर कोलकात्यामध्ये ३१ रूपये ५० पैसे आणि चेन्नईमध्ये ३७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

इंडियन ऑईलच्या संकेतस्थळानुसार, राजधानी दिल्लीमध्ये १४ किलोंचा विनाअनुदानित गॅसची किंमत ५९३ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ६१६ रुपये तर चेन्नईमध्ये ६०६.५० रुपये झाली आहे. आर्थिक राजधानी मुंबईत १४ किलोच्या विनाअनुदानिक गॅसची किंमत ५७९ वरुन आता ५९०.५० रुपये झाली आहे.

पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर एलपीजी सिलिंडरच्या किंमत वाढीचा कोणताही परिणाम होणार नाही. पीएमयूवायच्या लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत एक विनामूल्य सिलेंडर मिळणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी मोफत एलपीजी सिलेंडर देण्याची घोषणा केली होती.