अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईपासून तौते चक्रीवादळ १२० किमी अंतरावर घोंगावत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीला प्रचंड फटका बसत आहे. आता चक्रीवादळ संथगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत असलं तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईतही गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस पडत असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत पुढच्या काही तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला.

अतिरौद्रवतार धारण केलेल्या तौते चक्रीवादळाचा फटका मुंबईला बसला आहे. वादळी वारे आणि मुसळधार पावसाने मुंबई ठप्प झाली आहे. मुंबई लोकल सेवा विस्कळीत झाली असून, मोनो रेलची सेवा स्थगित करण्यात आली आहे. वांद्रे-वरळी सी लिंकवरून होणारी वाहतुकही रोखण्यात आली आहे. अर्नाळा किल्ल्यातील समुद्र किनाऱ्यावर मच्छिमार बांधवांनी बोटी नांगरून ठेवल्या होत्या. मात्र रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह धडकलेल्या मोठंमोठ्या लाटा व वादळामुळे बोटींचे दोर तुटून बोटी थेट किनाऱ्यावर आदळून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पुढील काही तासात मुंबईसह परिसरात अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून, वादळी वाऱ्यांचा वेगही वाढणार आहे. मुंबईत आगामी काही तासांत ताशी १२० वेगाने वारे वाहतील, असा इशारा हवामान विभागाने दिला असल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे