मध्यप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मंदिरांच्या वाऱ्या करत आहेत. गुजरात आणि कर्नाटक निवडणुकांनंतर आता काँग्रेसने मध्य प्रदेश निवडणुका झाल्यावर मध्यप्रदेश निवडणुकांसाठी शिवभक्त राहुल गांधी, नर्मदाभक्त राहुल गांधी असे बॅनर लावले आहेत. राहुल गांधी यांना शिवभक्त म्हणून समोर आणले जाते आहे. हिंदू व्होट बँक मिळवण्यासाठी आणि भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेसचा हा टेम्पल रन प्लॅन आहे.

पंधरा वर्षांपूर्वी दिग्विजय सिंग यांच्या नेतृत्त्वाखाली पोंगा पंडित यात्रा काढली होती. आता रामभक्त राहुल गांधी, शिवभक्त राहुल गांधी असे बॅनर लावण्यास सुरूवात केली आहे. २००३ मध्ये पोंगा पंडित यात्रा काढून भाजपावर टीका केली होती. पोंगा पंडित यात्रेत हिंदुत्त्ववाद्यांची यथेच्छ खिल्ली उडवण्यात आली होती. आता पंधरा वर्षांनी ते सगळे मागे सारत हिंदू मते मिळवण्यासाठी राहुल गांधींचा भक्त अवतार समोर आणला जातो आहे. नरेंद्र मोदींना टक्कर देण्यासाठी ही नीती जाणीवपूर्वक अवलंबली जाते आहे. पोंगा पंडित यात्रा काढल्याने काँग्रेसला पराभवाचा फटका बसला होता. आता हा फटका टाळण्याठी राहुल गांधींचा भक्त अवतार समोर आणला जातो आहे.

चित्रकूट, गुप्त गोदावरी, सती अनुसुया, मइहर मंदिर, राम मंदिर, सीतामढी, रामघाट यांसह अनेक महत्त्वाच्या मंदिरांना राहुल गांधी भेटी देत आहेत आणि देणार आहेत. २००३ ला काँग्रेसचे धोरण हिंदुत्त्ववाद्यांना विरोध करणारे होते. ते २००८ मध्ये आणि २०१३ मध्येही तसेच राहिले मात्र मध्यप्रदेशात पराभवच झाल्यानेच राहुल गांधी यांना भक्त म्हणून समोर आणले जाते आहे. राहुल गांधी यांचे हे धोरण आणि त्यांनी दिलेल्या मंदिर भेटी यांचा नेमका काय उपयोग झाला ते निकालानंतर स्पष्ट होणारच आहे. मात्र प्रचारासाठी टेम्पल रन म्हणजेच मंदिरांच्या भेटींचे हे धोरण अवलंबण्यात आले आहे.

भाजपाने मध्यप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम वन गमन पथ यात्रेचे आयोजन केले आहे. या यात्रेला टक्कर देण्यासाठी राहुल गांधी यांचा पंडित किंवा भक्त अवतार सातत्याने समोर आणला जातो आहे. एवढेच नाही तर काँग्रेसने आता प्रत्येक पंचायतीत गोशाळा असेल, गोरक्षा ही आमची जबाबदारी आहे अशीही आश्वासने देण्यास सुरुवात केली आहे. राहुल गांधींचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांना पंडित म्हटले जायचे. मग राहुल गांधी यांना पंडित म्हणण्यास काय हरकत आहे असे वक्तव्य नुकतेच एका काँग्रेस खासदाराने केले आहे.

Story img Loader