रायगडमधील देवकुंड धबधबा येथे पर्यटनासाठी आलेले तीन पर्यटक बुडाले आहेत. तिन्ही पर्यटक हे पुण्यातील रहिवासी असून तिघांचा शोध सुरू आहे. संदीप सिंग, सतिंदर लांबा आणि विश्वजित कुमार अशी या पर्यटकांची नावे आहेत.
माणगाव तालुक्यातील पाटनस येथील देवकुंड धबधब्यावर पुण्यातील तीन तरुण वर्षा सहलीसाठी आले होते. मात्र, पाण्याचा प्रवाह वाढला आणि तिघेही पाण्यात बुडाले. संदीप सिंग, सतिंदर लांबा आणि विश्वजित कुमार अशी या तिघांची नावे असून तिघांचाही शोध सुरू आहे.
पर्यटकांचे होणारे मृत्यू लक्षात घेऊन कर्जत, खालापूर आणि माणगाव तालुक्यातील धरणे आणि धबधब्यांवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आले होते. रविवारपासूनच देवकुंड धबधब्यावर जाण्यास परवानगी देण्यात आली होती.
तर, दुसरीकडे पुणे ग्रामीणमधील देहूगाव येथे इंद्रायणी नदीत एका गणेश भक्ताचा बुडून मृत्यू झाला आहे. दुपारच्या वेळी ही घटना घडली. संदीप साळुंखे असे बुडालेल्या १९ वर्षीय तरुणाचे नाव आहे. विसर्जन करण्यासाठी नदीत उतरला असताना तो बुडाला. बुडालेल्यांना शोधण्यात स्थानिकांना अपयश आल्यानंतर एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. त्यानंतर तब्बल तीन तासांनी त्याचा शोध लागला. त्यानंतर संदीप तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.